पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेव्हापासून दुर्योधनाने हा प्रश्न पुन्हा कधीही विचारला नाही. दुर्योधनाच्या पत्नीचा उपभोग घेण्यासाठी शेष येत असे. जांभूळ आख्यानासारखी ही कथासुद्धा लोकवाङ्मयातून मिळते.
 बाबिलोनियात अस्वार्ती नावाची एक कामदेवता असे. तिचे वाहन सर्प होते. कटनर नामक मानववंश शास्त्रज्ञाने सर्प हे सुफलीकरणाचे प्रतीक असल्याचे सांगितले आहे. सर्पदंश हा वासनादंशाचे प्रतिरूप म्हणून सर्व धर्म वाङ्मयातून येतो. बायबलमधील आद्य जोडपे ॲडम आणि इव्ह यांच्या कहाणीत सर्प कामविकाराचे प्रतीक म्हणून येतो असे दैवतविषयक प्रतिकांचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांचे मत आहे असे डॉ. तारा भवाळकर 'लोकसंचित' या ग्रंथातील नागबंध या टिपणात नोंदवतात.
 महाराष्ट्रात नाग 'बंधू' च्या रूपात -
 वैशाख, जेष्ठ, आषाढात शेतीच्या मशागतीत आणि पेरणीच्या धांदलीत शेतकरी कुटुंब आकंठ बुडालेले असते. शेतकरी कुटुंबातील स्त्रियांना शेतात राबावे लागते. पेरण्या संपल्यानंतर त्यांना थोडी उसंत मिळते. अशा वेळी मन मोकळ करायला, थकवा घालवायला दोन दिवस तरी माहेरी जावे असे त्यांना वाटतेच. खेड्यातील प्रत्येक स्त्री मनापासून नागपंचमीची वाट पाहत असते. प्रत्येक आईचे मन लेकीला भेटायला आसुसलेले असते. आपला लेक बहिणीला आणायला जाण्याचे नाव काढीनासा झाला तर ती मनोमन दुखावते आणि लेकाला म्हणते-

आली बाई वर्साची पंचमी
आली वर्साची पंचमी
अरे सुभाना बाळा
जा रे बाळाई बोलावू
लोकाच्या लेकी माहेरात
आमची बाळाई सासऱ्यात

 नाग वा सर्पाबद्दल प्रत्येकाच्याच मनात भय असतं, विशेषतः शेतात काम करणाऱ्यांशी तर त्याची नेहमीच गाठ पडते. नागामुळे शेतकऱ्याचे बियाणे, धान्य उंदरापासून वाचते. अशा क्षेत्ररक्षक नागाला महाराष्ट्रातील स्त्रीने बंधू मानले आहे.

भूमी आणि स्त्री
१५९