Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नागपंचमी : सुफलीकरणाशी जोडलेला सण -
 नागाला क्षेत्ररक्षक मानले जाते. तो भूमीचा रक्षणकर्ता मानला जातो. शेतात वारूळ असणे हे शुभलक्षण मानले आहे. वारुळाची माती ही सर्वात सुफल माती मानली जाते. वारूळ हे भूमीच्या सर्जनेन्द्रियाचे प्रतीक मानले आहे. तर नाग हा पुरुष तत्त्वाचे.... पुरुषत्वाचे प्रतीक मानला जातो. नाग क्षेत्रपतीअसून त्याचे भूमीशी साहचर्य असते. त्याच्या अस्तित्वामुळे भूमी सुफलित होते. रेणुका, मातंगी, सांतेरी, दक्षिणेतील एल्लम्मा या समाजात मान्यता असलेल्या भूदेवींच्या उपासनेत नागचिन्हाला विशेष महत्त्व आहे. वारुळातील मातीला मूलमृत्तिका असे म्हणतात. नाग ही संतानदेवता असून ज्यांना मूलबाळ नाही अशा स्त्रिया नागपूजा करतात. नागबलीचे व्रत यासाठी प्रसिद्ध आहे. विजेची तेजाने सळसळणारी गती, नागाची नागमोडी चाल, विजेनंतर येणारा सहस्रधारांनी जमिनीला चिंब भिजवणारा पाऊस आणि त्यानंतर फुलणारी हिरवी किमया. म्हणून तो सुफलीकरणाचे प्रतीक मानला जातो. जणु धरतीला सुफलित करणारे ते पुरुषतत्त्व असते.
 सर्प आणि कामवासना : भारत आणि भारताबाहेरील संकल्पना -
 अनेक भारतीय लोककथांतून पुराणकथांतून नागलोक भूमी मानली आहे. पृथ्वीवरच्या सुंदर आणि पराक्रमी पुरुषांवर नागकन्या भाळतात व त्यांना नागलोकात नेतात असा कल्पनाबंध अनेक लोककथांतून येतो. अर्जुनाची एक पत्नी, उलूपी ही नागकन्या होती. भारतीय धारणेनुसार पृथ्वीला शेषनागाने मस्तकावर तोलले आहे. शेषनाग हे वासनेचे प्रतीक म्हणून संपूर्ण पृथ्वीच वासनामय आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रकृती वासनामय असल्याचे सांगितले आहे.
 शेषनाग हा कामवासनेचा प्रतीक मानला जातो. या संदर्भात एक लोककथा अशी. द्रौपदी ही पाच भावांची पत्नी होती. तिला आळीपाळीने एकेका पतीजवळ जावे लागे. या गोष्टीचे दुःख स्त्री म्हणून तिच्या मनात असणारच. तिच्या या असहाय परिस्थितीवर नेमके बोट ठेवून दुर्योधन तिला आजूबाजूला कोणी नाही असे पाहून विचारी 'आज पाळी कुणाची ? आणि हसे. हे दुःख हा अपमान द्रौपदी सांगणार तरी कोणाजवळ ? द्रौपदीने आपले मन श्रीकृष्णाजवळ मोकळे केले. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की 'आज शेषाची नव्हती. एवढेच उत्तर दे. द्रौपदीने हे उत्तर दिले आणि

१५८
भूमी आणि स्त्री