पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आदल्या दिवशी म्हणजे चौथीला प्रत्येक बहीण भावाच्या उत्कर्षासाठी, सुफल भवितव्यासाठी उपवास करते. नागपंचमीस चुलीवर तवा ठेवणे, चिरणे, जमीन उकरणे या गोष्टी करणे निषिद्ध मानले जाते. पंचमीस देशावर पुरणाचे उकडलेले दिंड करतात तर कोकणात तांदळाच्या रव्याची खांडवी करतात. नागपंचमीच्या दुसरे दिवशी कर असते. या दिवशी भुलोबा मांडून त्याची पूजा करतात. काही भागांत शिराळशेठ मांडतात. मराठवाड्यातील गावांतून भुलोबा मांडण्याचा मान आळीपाळीने एकेका घराकडे असतो. भुलोबाची माहिती स्वतंत्रपणे दिली आहे.
 वारूळाची पूजा सामूहिक : अठरापगड जातींच्या स्त्रियांचे एकात्म मन -
 नागपंचमीच्या दिवशी पाटावर नागोबाच्या आणि त्यांच्या पिल्लांच्या आकृत्यांची पूजा घरात केली जाते. परंतु या दिवशी खेड्यातील महिला वारूळाला जाऊन वारूळाची पूजा करतात. ही पूजा आळीतील सर्व जातिजमातीच्या महिला एकत्र येऊन करतात. यंत्रयुगाच्या रेट्यात या सणातील सामूहिक अभिव्यक्ती वरचेवर कमी होत चालली आहे. तरीही मराठवाड्यातील खेड्यांतून स्त्रिया वारूळ पूजण्यासाठी एकत्र जमून जातात. त्या निमित्ताने ५/६ दिवस फेरावरची गाणी, फुगड्या, झिम्मा यांनी रात्र रंगून जाते. झाडाझाडांवर झोके बांधले जातातच. उंचउंच झोक्यांच्या तालावर गाणीही. त्या गाण्यांतून मोकळे होणारे स्त्रीसमूहाचे एकात्म मन जणु आभाळाला आपल्या जीवनाची गाथा सांगत असते.

आली वर्षाची पंचीम
आत्या मी जाऊ का वारुळाला?
वेडी झालीस भारजा
मणभर साळी सडायच्या...

 तरीही भारजाने मणभर साळीचा एकच घाणा केला. खाष्ट सासूने सणाच्या उत्साहात मणभर गव्हातांदळाचा धातलेला अडसर दूर करून ती न्हायली. शृंगार केला आणि गावात गेली. गावातील लेकीसुनांना साद घातली.

वाण्या बामणाच्या मुली
वारूळाला येता का कुणी?
साळ्या कोष्ट्याच्या मुली

१६०
भूमी आणि स्त्री