Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामाजिक कौटुंबिक महत्त्वाशी ती जोडलेली आहे. मानवी जीवनाच्या प्रवासात, विकास प्रक्रियेत त्यांचे महत्त्व दुय्यम होत गेले. या प्रवासाचे निखळ प्रतिबिंब या विधीउत्सवांतून व तत्संबंधी गाण्यांतून दिसते. गेल्या दोन हजार वर्षांत तिच्या 'माणूस' म्हणून जगण्याकडे दुर्लक्ष झाले. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या दडपणाखाली तिला जगावे लागले. राजघराण्यांतील स्त्रियांना कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली. पण ती पतीच्या अनुपस्थितीत. या शोधनातून असे लक्षात आले की या विधिउत्सवांतील स्त्रीप्रधानतेची मुळे, पूर्व वैदिक काळातील स्त्रीप्रधान जीवन पद्धतीत आहेत. आज भारतीय स्त्रीजीवनास शक्ती द्यावयाची असेल, त्यांना मध्यवर्ती जीवन प्रवाहात सहभागी करून, भारताच्या राष्ट्रीयत्वाला बळकट करायचे असेल तर सर्वसामान्य स्त्रीच्या जगण्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. स्त्री-प्रधान जीवन व्यवस्था वा पुरुषप्रधान जीवन व्यवस्थेपेक्षा प्रगतिशील भविष्याची दिशा, स्त्रीपुरुष समानतेवर, उभयतांच्या परस्पर समानधर्मी पूरकतेवर आधारलेला समाजच देऊ शकेल. त्या दृष्टीने या लोकधारणांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यातूनच एकात्म भारतीय संस्कृती हीच 'भारतीय राष्ट्रीयत्वाचा' मूलभूत आधार आहे हे सत्य समाजासमोर येईल.
 डॉ. राम मनोहर लोहिया लिहितात, 'स्त्रीपुरुषांना समान न्याय असावा. स्त्रीने भारभूत बनू नये. प्रसंगवश पुरुषाचा भार संभाळून तिने स्वतंत्रपणे मार्ग काढावा'.
 स्त्रीच्या समर्थ भूमिकेला ऐतिहासिक संदर्भ देणारे, तिच्यातील आत्मविश्वास जागवणारे, तिने प्राचीन काळी बजावलेल्या रचनात्मक भूमिकेचे समाजाला भान देणारे हे विधिउत्सव या शोधप्रबंधाद्वारे विस्ताराने व विश्लेषण करून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

भूमी आणि स्त्री
११