पैंजणातून ओघळणाऱ्या धुंगराप्रमाणे बरसणाऱ्या पाऊसधारा, तोरड्यांच्या धुंगराप्रमाणे झिळमिळणाऱ्या परिपुष्ट भातपिकाच्या ओंब्या याचे ध्वनिचित्र वरील ओळीतून प्रतीत होते.
सात, सोळा हे आकडे लोकसाहित्यात वारंवार येतात. त्या आकड्यातून मांगल्य, समृद्धी, शुभ इ.चे सूचन होते. या गाण्यातून सलग असा अर्थ काढण्याचा प्रयास अप्रस्तुत ठरतो. लोकगीतांत स्वरमाध्यम आणि लय महत्त्वाची असल्याने केवळ शब्दरचनेचा विचार अपुरा ठरतो. या गाण्यांतून प्राथमिक, कृषिधर्मी जीवन जगणाऱ्या लोकसमूहांनी कृषिसमृद्धीसाठी सुफलीकरण यातुविधींच्या वेळी गायलेल्या मंत्रात्मक प्रार्थनांचे अंधुक संकेत मिळतात.
गाणे - २ : आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंडू
राया चेंडू झुगारिला
आपण चाले हत्ती घोडे
राम चाले पायी
एवढा डोंगर शोधिला
रामाचा पत्ता कुठं नाही
राम ग वेचितो कळ्या
सीता ग गुंफिते जाळ्या
आली ग लगिन वेळा
जरतारी घातिलं बोहल
नवरा नवरी बसली पाटी
पाटी पाटी तिरु तिरू राळा
तिरु बाई राळा मुंजक वाळा
मुंजक बाळाची मुंज दोरी
तीच दोरी सावध करी
सावध सावध सर्वत काळ
सर्वत काळचा उत्तम दोर