या गाण्यातील विविध संकेतांवरून ही गाणी कृषिधर्मी जीवनाशी निगडित असावीत असे वाटते. शेतातील धनधान्य पीक भराला आल्यावर, राखणीसाठी जे बाहुले तयार केले जाते त्यास 'भुलोबा' म्हणतात. तो शेताचा संरक्षक असतो. या कृषिसंबंधित गाण्यात मारूती, यक्ष, भुलोबा इत्यादी 'ग्रामरक्षक' देवतांचे उल्लेख वारंवार येतात असे दिसते. भुलोबा वीरशैव शंकराचे प्रतीक तर भुलाबाईहे पार्वतीचे रूप. भूदेवी ही गाव आणि शेतकऱ्याची संरक्षक देवता मानली जाते.
गीतातील नादमयता : ध्वनिचित्रे -
पडपड पावसा थेंबो थेंबी
थेंबोथेंबी आळव्या लोंबी
आळव्या लोंबती अंकणा
अंकणा तुझी सात कणसं
भोंडल्या तुझी सोळा वर्षे
या ओळीमधुन धनलक्ष्मीचे ध्वनिचित्र चित्रित झाले आहे. लोकगीतांत मंत्रात्मकता असते. ७लोकगीत म्हणजे आदिकालीन स्वयंस्फूर्त संगीत: त्यांत शब्दापेक्षा स्वर आणि लय यांच्या अदभुत मिश्रणातून तयार झालेल्या मंत्रात्मकतेवर भर आधिक असतो.
मणिपूर, त्रिपुरा, मध्य प्रदेश येथील काही आदिम जमातीमध्ये काही लोकगीते अशी आहेत ज्यात शब्द नाहीत. केवळ लयप्रधान स्वररचना आहे. लोकगीतांचा संभव स्वरांपासूनच होतो. मनुष्य काही भावनापूर्ण क्षणांमध्ये स्वरांची एक सृष्टी निर्माण करतो आणि त्यालाच गुणगुणतो. काही काळानंतर याच स्वरसृष्टीमध्ये उपयुक्त शब्द योजिले जातात. अशी अनेक गाणी रचनाकारच्या व्यक्तिकतेच्या बाहेर येऊन सामाजिक बनतात आणि व्यक्तिकत्वाला त्यात जिरवून टाकतात. या प्रचलित गीतांतील शब्द काळानुरूप दुबळे होऊन विस्मृतीत जातात. त्या जागी नवे शब्द येतात. समूहजीवनाच्या संदर्भात त्या शब्दांची अन्वर्थकता नाहीशी होते आणि मग या शब्दांना अनाकलनीय असे स्वरूप प्राप्त होते. मूळ शब्द कोणते ते ओळखणेही अशक्य होते. गाणी निरर्थक वाटू लागतात. तरीही त्या गीतांतील मूळ स्वरसमूह आणि लय तालतत्त्व यामुळे ही वरवर निरर्थक वाटणारीगीते लोकसमूहात शतकानुशतके टिकून राहतात.