पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९

 २ सुशब्दत्व-क्रोध, ईर्ष्या इत्यादिकांच्या योगानें, वक्त्याच्या मनांत, दुसऱ्यास कठोर भाषण करण्याचें येतें, तेव्हां तो कठोर अर्थ जेथें मृदुशब्दांनीं सुचविला असतो, तेथें हा गुण होतो. जसें--

 "आजकालच्या नव्या सुधारणेविषयीं, जुन्या मंडळीनें किती जरी आपली असंमति, अनुदारता, अप्रेम, व संताप प्रकट केला, तरी दिवसानुदिवस त्या प्रबळच होणार. व पिंपळाचें झाड एकदां एखाद्या इमारतीवर वाढलें, तर तें जसें त्या पक्क्या इमारतीचाही नाश केल्यावांचून राहत नाहीं, त्याप्रमाणें ह्या सुधारणा आतां त्यांच्या प्रतिबंधानें अांवरल्या जाणाऱ्या नसून उलट त्या त्यांच्याच असुखास व त्वेषास मात्र अधिक कारण होतील, इतकेंच नाही, तर ह्या सुधारणादेवीच्या प्रसादनार्थ त्यांस कदाचित् आपलीं पूर्वीचीं मतें, किंवा निदान आपले देह तरी समर्पण करावे लागतील. अन्यथा ह्या देवीचा संतोष होणें नाहीं, हें त्यांनीं खूप समजून ठेवावें."

 ह्या वाक्यांत "जुन्या मताच्या लोकांनीं सुधारणेविरुद्ध किती जरी ओरड केली तरी कांहीं होणें नसून, उलट तसें त्यांनीं केल्यास, त्यांचा स्वतःचाच नाश होईल.” असा कठोर अर्थ सुचविणें असून तो अंमळ मार्दवानें सुचविला आहे.

 ३ पर्यायोक्ति-एखाद्या गोष्टीचें आरंभापासून शिस्तवार वर्णन केलें असतां हा गुण होतो. जसें--

  भा. ५