पान:भाषाशास्त्र.djvu/94

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ८३ वैय्याकरणांच्या मते नाम, क्रियापद, उपसर्ग, आणि निपात, हीं तिची चार रूपे समजावयाची. मंत्र, कल्प, ब्राह्मण, व लौकिकी, अशी चार रूपें याज्ञिकांच्या अभिप्रायाप्रमाणे होत. ऋग, यजुः, साम, आणि लौकिका, अशी नैरुक्तांच्या मते वाचेची चार रूपे समजावयाची. सपची भाषा, पक्षांची भाषा, तिर्ययोनीतील क्षुद्र जीवजंतूंची भाषा, व व्यावहारिक भाषा, असे वाचेचे चार प्रकार असल्याविषयीं, ऐतिहासिकांचा अभिप्राय आहे. आत्मवादींच्या मते, पशु, तूणव, मृग, आणि मनुष्य, यांच्याच चार भिन्न भिन्न वाचा होत. तसेच, योग्यांच्या मताप्रमाणे, परा, पश्यन्ति, मध्यमा, व वैखरी, हेच वाचेचे चार प्रकार आहेत. | मूलस्थ आधारापासून उत्पन्न झालेली जी नादादिमका वाणी, तिला परा म्हणतात. जी नादाच्या सूक्ष्मत्वामुळे, योग्यांशिवाय अन्य कोणासही भासमान होत नाही, आणि जी फक्त हृदयस्थच आहे, ती पश्यन्ती समजावयाची. हिचाच बुद्धीशी मिलाफ होऊन, जेव्हा तिला विवक्षा प्राप्त होते, तेव्हा तिला मध्यमा म्हणतात; कारण, मध्यस्थ असलेले जे हृदय त्याच्यापासूनच हिचा उद्गम होतो. पुढे, हिचाच कंठापर्यंत प्रवेश झाल्यावर, ज्या वेळेस दंतौष्ठादि स्थांनांचे साहाय्य मिळून ती मुखावाटे बाहेर पडते, त्या वेळेस तिला वैखरी अशी संज्ञा प्राप्त होते. आतां, ह्यांपैकीं, पाहिले तीन प्रकार हृदयान्तर्गत असल्या कारणाने, ते अर्थात्च गुप्त समजावयाचे; आणि राहिलेला चौथा व शेवटला प्रकार मात्र मनुष्यांची व्यावहारिक भाषा होय, असे योगी मानतात.