पान:भाषाशास्त्र.djvu/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५ )

ऐकण्यांत किंवा पहाण्यांत नाहीं, येवढें मजला कबूलच केलें पाहिजे. सबब, ह्या संबंधानें आपल्या प्रियतम आर्यभूमीची सेवा कशी बशी तरी आपल्या हातून घडावी, इतकाच हेतु धरून, हा मनोभावानें केलेला अत्यल्प प्रयत्न मी आपल्या नितान्तप्रिय मातृसेवेशीं केवळ भीतभीतच सादर करीत आहे.

 भीतभीत ह्मणण्याचें कारण इतकेंच कीं, आर्यमातेच्या योग्यतेप्रमाणें आणि ऐश्वर्यानुरूप ही सेवा झालेली नसून, ती गोष्ट हा सेवक पूर्णपणें जाणून आहे. परंतु, शक्तीशिवाय भक्ति नाहीं; जाळावांचून कड नाहीं; व मायेवांचून रडें नाहीं. सबब, यथामति जें कांहीं झालें तेंच, मी आपली इतिकर्तव्यता समजून, मातृचरणी अर्पण करीत आहे.

 ही अत्यल्प सेवा बजावितांना, मजला अनेक ग्रंथांचें साहाय्य झालें आहे. सबब, त्याबद्दल केवळ आनंदानें व कृतज्ञतापूर्वक, मी त्या त्या ग्रंथकारांचें आभार मानितों.

 हा भाषाशास्त्रविषयक प्रयत्न पहिलाच असल्यामुळें, त्यांत अनेक चुका होण्याचा संभव आहे. आणि माझ्यासारख्या अल्पधीच्या हातून तर त्या केवळ संख्यातीतच होतील; व मतभेदही ठिकठिकाणीं होईल, यांत कांहींच संशय नाही. तथापि, तत्संबंधानें वाचकांनी मजवर अनुग्रहच केला पाहिजे, अशी माझी त्यास विज्ञप्ति आहे.


मुक्काम पुणे. मंगळवार,

मार्गशीर्ष शुद्ध १३ शके

१८२२ शार्वरीनामसंवत्सरें.    नारायण भवानराव पावगी.