तथापि, ते सर्व संस्कृत व तदुद्भूत प्राकृत भाषाविषयकच असल्यामुळें, पृथ्वीवरील सर्व भाषांचें विवेचन, त्यांचे शास्त्रीय वर्गीकरण, त्यांची परस्पर तुलना, त्यांची उपपत्ति, त्यांचे उद्गमस्थान, त्यांचे स्थलांतर, रूपान्तर, आणि अन्य ऐतिह्य, इत्यादिसंबंधी हकीकत यांत नाही, हें उघड आहे. कारण, दळणवळणासारख्या कित्येक हरकतीमुळें, व अवश्य तीं साधने उपलब्ध नसल्यानें, ती त्यावेळी बिलकुल देतांच आलीं नाहीं; आणि ती देतां येणें देखील अगदींच शक्य नव्हतें; हें कोणासही कबूल केलें पाहिजे.
सांप्रतकाळी, सुगमप्रवास, साहसप्राचुर्य, नौकागमन, लोहमार्ग, तारायंत्र, वगैरे हरएक प्रकारची संपूर्ण अनुकूलता असल्यानें, आशिया, यूरोप, आफ्रिका, अमेरिका, आस्ट्रेलिया, व अन्य द्वीपसमूह, यांच्याशी आमचा सतत आणि निकट संबंध होत गेला. त्यामुळें, सर्व प्रकारची जा, ये, जिकडे तिकडे सुरू झाली; व मनुष्याच्या ज्ञानभांडारांतही एकसारखी भरच पडत चालली.
अर्थात्, ह्या ज्ञानवृद्धीनें शास्त्राच्या प्रत्येक शाखेला नूतन अंकुर फुटू लागले; आणि त्यासरसें भाषाशास्त्राच्या प्रच्छिन्न बीजाचेही आपोआपच पोषण होत जाऊन, ह्या अत्युपयुक्त विषयावर विसृत व व्यापक ग्रंथ होण्यास एक उत्कृष्ट संधि मिळाली.
ह्या अमूल्य संधीचा सदुपयोग कित्येक पाश्चात्यांनीं अगदीं वेळेवर आणि चांगल्या प्रकारें केला, याबद्दल त्यांचे साभार अभिनंदन केलें पाहिजे. लीबनिझ् सारख्यांनी ह्या भूतलावरील अनेक देशांतील भिन्नभिन्न भा-