पान:भाषाशास्त्र.djvu/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामान्यविवेचन व दिग्दर्शन.

 तसेंच, पाश्चात्य राष्ट्रांनी ह्या बाबतीत कोणती चळवळ सुरू केली; त्यांत त्यांस कितपत यश आले; त्यांनी प्रथमतः भाषेचे वर्गीकरण कसें केले; भाषेच्या संबंधाने त्यांच्या कशा प्रकारच्या कल्पना होत्या; मायभाषेविषयीं भिन्नभिन्न राष्ट्रांचें कसें मत असे; हल्लीं त्यांत कोणता फेरफार झाला आहे; तो होण्यास कोणतीं कारणें उद्भवलीं; अनेक भाषांतील शब्दांचें साम्य आणि त्यांचे व्याकरण, यासंबंधानें विचार करितां, मायभाषेचें श्रेष्ठत्व कोणत्या भाषेकडे येतें; इत्यादि गोष्टींचें तपशिलवार विवेचन ह्या भाषाशास्त्रांतच होणे अगदी जरूरीचें आहे.

विषयमहात्म्य

 अर्थात् , अशा प्रकारचें व्यापक निरूपण करण्याला, सर्व भाषांत चांगलेंच प्राविण्य पाहिजे आहे. इतकेंच नव्हें तर, अनेक विषयपारंगता, आकलनशक्ति, विद्वत्ता, प्रागल्भ्य, समीकरणसामर्थ्य, आणि आन्वीक्षिकी विद्यचें सूक्ष्मावलोकन, वगैरे नानाविध गुणांची देखील निःसंशय मोठीच आवश्यकता आहे; आणि हे गुण नसतील तर, अशा प्रकारचे विवेचन होणें देखील अगदीच शक्य नाहीं.

व अंगीकृत सेवेचा शक्तीबाहेरचा बोजा.

 तेव्हां, असें असतां, व अवश्य तो एकही गुण माझ्यांत वास करीत नाहीं हें मजला माहीत असून देखील, हा सांप्रतचा केवळ माझ्या शक्तीबाहेरचा बोजा, मी आपल्या शिरावर घेतला आहे.

 तथापि, वाचकांच्या मनाची उदारता, त्यांची सहानुभूति, त्यांची स्वभावज अनुकंपा, आणि त्यांचा अनुग्रह,