त्याची व्याप्ति.
शिवाय, भाषा म्हणजे काय; ती कशी उत्पन्न झाली; तिच्यांतील मूळशब्द कोणते; ते कसे प्रचारांत आले; त्यांचे ऐतिहासिक बीज केव्हां दृग्गोचर होऊं लागलें; आपापले विचार प्रदर्शित करण्यासाठीं, मनुष्यमात्राला शब्दांची आवश्यकता केव्हां व कशी भासमान झाली; ही उत्पन्न झालेली अडचण दूर होण्यास्तव त्यानें कोणते उपाय योजिले; कशा प्रकारची सांकेतिक चिन्हें त्याने अमलांत आणिली; कोणकोणया वाक् संज्ञांचा त्यानें उपयोग केला; लिपिज्ञानांत, किंवा लेखनकलेंत, त्यांचा कशा प्रकारें उपयोग झाला; ह्या संबंधाने आमच्या आर्य पूर्वजांनी कोणत्या दिशेने कसे प्रयत्न केले; इतर पौरस्त्य राष्ट्रांनीं तद्विषयक कोणते यत्न चालविले; इत्यादि सर्व बाबतींचा समावेश भाषाशास्त्रांतच होणें विशेष अगत्याचें आहे.
त्याचप्रपाणें, भाषा ही अमानुषी व दैवी आहे, किंवा ती कृतक आणि समाजघटित समजण्याची; ती मानवी कुटुंबाची द्योतक आहे कीं नाहीं; म्हणजे, भाषाभिन्नत्वानें कुटुंबभिन्नत्व अथवा वर्णविभेद समजण्याचा कीं कसे; भाषेचा उद्गम प्रथमतः कोठें झाला; तिचा ओघ कोणीकडून कोठें चालला; तिचा प्रसार कोणीकडे कसकसा होत गेला; त्या कारणानें, तिच्यांत कोणत्या प्रकारचें स्थित्यन्तर होत चाललें; त्याचा काय परिणाम घडून आला; भाषेच्या जन्मभूमीवरून, राष्ट्राचें आदिनिवासस्थान काढतां येणें शक्य आहे की नाहीं; वगैरे गोष्टींचा अन्तर्भावही भाषाशास्त्रांतच झाला पाहिजे.