पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तयारी वंदना उपोदयात आपण हिंदुस्थानांतील लोक आम्हांला स्वराज्य पाहिजे म्हणतो, इतकेंच नव्हे तर आम्ही स्वराज्याला लायक आहोत असे म्हणतो; पण आपण आपला मागला सर्व इतिहास विसरून व हल्लींच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून असे म्हणतो. इसवी सनापूर्वी हिंदुस्थानांत उत्कृष्ट स्वराज्य होते व ते पाश्चात्त्यांच्या स्वराज्यापेक्षांहि उज्वल होते. पण ग्रीक, इराणी, मुसलमान वगैरे परकीयांशी झगडतां झगडतां आपण ते गमावले व फिरून तें महत्प्रयासांनी आपण मिळविले; पण आपल्या अंगी खिळलेल्या वाईट खोडींनी ते आपणांस राखता आले नाही, असा आपला इतिहास आहे. हल्लींची आपली स्थिति अत्यंत बिघडलेली आहे. आपल्यांत तप ( कष्ट सोसण्याची धमक ), दम (आत्मसंयमन ) व नियम (शिस्तीने वागण्याची संवय ) बिलकुल नाही. प्रत्येक इसमाला स्वार्थापलीकडील देशहित पाहण्याची मुळी जरूरच वाटत नाही. अशा स्थितीत आम्ही स्वराज्याला लायक आहों म्हणणे म्हणजे निव्वळ आपणांस फसविणे आहे. आपणांस स्वराज्य मिळावयाचे असले तर आपण किती तयारी केली पाहिजे व मिळालेले स्वराज्य कायम टिकविण्यासाठी आपल्या अंगी कोणते गुण पाहिजेत याचा कोणी विचारच केलेला दिसत नाही, कोणत्याहि कायोचा पहिल्याने काही तरी नकाशा तयार करणे, मग ते काम करण्यासाठी लागणाऱ्या साधनांची तरतूद व जुळवाजुळव करणे, व शेवटी त्याप्रमाण तें काम वठवून दाखविणे या ज्या कामाच्या तीन पायऱ्या त्या स्वराज्यप्राप्तीला नकोत अशीच पुष्कळांची समजूत दिसते. ही समजूत बदलली पाहिजे. महत्प्रयास, मोठे कष्ट, बलवत्तर जूट, अत्यंत स्वार्थत्याग याशिवाय स्वराज्य मिळणार नाही व कदाचित् ते मिळाले तर टिकणार नाही हे ओळखून स्वराज्यसंपादन व रक्षण यासाठी आपण कोणती तयारी केली पाहिजे हे सर्वापुढे ठेवण्याचा प्रयत्न या पुस्तकांत केला आहे.