पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इष्ट सुधारणा नव्हती. अलीकडेच हा निबंध काढून टाकण्यात आला आहे; पण त्यांतहि अनेक भानगडीचे प्रश्न आहेत. अशा स्थितीत हिंदुस्थानच्या एकंदर लोकसंख्येपैकी शेकडा सात लोकांना सुद्धां नुसती अक्षरओळखहि नाही. मग नागरिक होण्याला योग्य अशा शिक्षणाची गोष्टच बोलू नये. व या गोष्टीचे आश्चर्यहि वाटण्याचे कारण नाही. हिंदुस्थानाच्या लोकसंख्येच्या मानाने उच्च शिक्षण देणारी विद्यापीठे तर फारच थोडी आहेत व ही थोडी सुद्धा पूर्ण शिक्षण देण्याइतक्या सुस्थितीत नाहीत. याबाबद सरकारने सढळ हातांनी स्वतः खर्च केला नाही व खाजगी संस्थांनी हे काम हातीं घ्यावे इतके त्यांस प्रोत्साहनहि दिले नाही. हिंदुस्थानांतील असलेले जुने अनेक उद्योगधंदे इंग्रजी अमदानींत बुडाले व नवीन उद्योगधंदे सुरू करणे व त्यांची अभिवृद्धि करणे इकडे अजिबात लक्ष दिले नाही. याशिवाय हिंदुस्थानांत सर्व प्रकारच्या परदेशी मालांस मुक्तद्वार ठेवल्यामुळे जे काही धंदे अद्याप जीव धरून आहेत त्यांचीहि वाढ खुंटली आहे. याप्रमाणे दिवसेंदिवस हिंदुस्थान अधोगतीच्या मागात सर्व प्रकारे खोल खोल जात आहे, हिंदुस्थानांतील तीन चतुर्थांश लोकसंख्या शेतीवर निर्वाह करीत असते व ही शेती सुद्धां शिक्षणाच्या अभावी व गरीबीमुळे कश्यपांच्या वेळच्या हत्यारांनी व पद्धतीने अद्याप चालू आहे व जमीनीचा गेलेला कस भरून काढण्याचा मुळीच कोणीहि प्रयत्न सुद्धा करीत नाही. यामुळे दर एकरी जमीनीचे उत्पन्न अत्यंत थोडे असून त्यांत शेतकऱ्याचे एक वेळी कसे बसें पोट भरते. इतकी उपासमार चालू आहे तरी लोकांना शेतीशिवाय दुसरा काही तरी उद्योग लावून द्यावा अगर घरच्या घरीच शेतीला जोडून कांहीं पोट भरण्याचे दुसरे साधन दाखवून द्यावे अशी योजना करण्यांत आलेली नाही. हिंदुस्थानांत शेतीचे काम वर्षाकाठी अवघे सहासात महिनेच असते व बाकी उरलेल्या काळाचा सदुपयोग करण्यास शेतकऱ्यास शिकवू नये ही मोठी खेदाची व लाजिरवाणी गोष्ट आहे. इतकी ही सर्व व्यवस्था सुधारलेल्या म्हणविणाऱ्या, कारागिरीवर आपल्या देशांतील सर्व लोकांचा निर्वाह सुखाने चालविणाऱ्या, जगांतील अत्यंत प्रबल व पहिल्या प्रतीच्या सरकारच्या नजरेखाली व तिकडून मुद्दाम निवडून आणलेल्या मोठमोठ्या पगारांच्या नोकरांकडून घडवून आणली आहे.