पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० १८ याप्रमाणे आपल्यापुढे जी कामे आहेत ती करण्यासाठी लोकांची तयारी पाहिजे. सर्व शाळांतून राजशासन व अर्थ या दोन शास्त्रांचे शिक्षण मिळावे, प्रत्येक गांवांत, कसब्यांत व शहरांत संघ स्थापन होऊन या संघांनी इतर सुधारलेल्या देशांत नागरिक शहराच्या कारभारांत कसे लक्ष घालतात हे सांगून आपण तसे लक्ष घालून दाखविले पाहिजे. 2. लोकांना शिक्षण देण्यासाठी स्थानिक संस्थांनी आपल्या नागरिकांना व प्रांतिक सरकारांनी आपल्या प्रांतांतील व्यापारी, धंदेवाले व शिक्षक यांना बाहेरचा मुलूख. पाहण्यास पाठवावें. हिंदुस्थानाबाहेर कानडा, जपान, आस्ट्रेलिया हे देश शेती, धंदे व कारखाने चालविण्याचे शिक्षण घेण्यास उत्तम आहेत. त्या त्या व्यवसायांतील तज्ञ निरनिराळ्या देशांत फिरून आले तर त्यांची दृष्टि फांकते, ज्ञान वाढते व एकंदर देशाचे हित होते. नुसते विद्यार्थी पाठविण्यापेक्षा माहितगार माणसे पाठविण्यांत फार फायदा आहे. दरसाल कायदेकौंसिलच्या बैठकीत देशाचे उत्पन्न व लोकांचे सामर्थ्य बाढविण्यासाठी त्या सालांत काय केले याचा अहवाल वाचावा, व हा अहवाल सर्वत्र विक्रीस ठेवावा. प्रत्येक कमिटीने किंवा बोर्डाने आपला अहवाल याचप्रमाणे चर्चेस व विक्रीस ठेवावा. असे केल्याने देशाचा उत्कर्ष कसा होत आहे हे साऱ्या लोकांच्या लक्षात येईल. तालुकाबोर्ड, जिल्हाबोर्ड, म्युनिसिपालिटया यांत सार्वजनिक बाबींची चर्चा करण्यासाठी अधिकारी व स्वतंत्र लोक यांच्या कमेट्या नेमाव्या. या कमेट्यांनी फक्त सल्ला द्यावी असे ठरविले तरी सुद्धा जनता व अधिकारी यांचा मेळ चांगला बसेल, अधिकाऱ्यांचे म्हणणे जनतेपुढे व जनतेचे म्हणणे अधिकान्यांपुढे मांडण्यांत या कमेट्यांचा फार उपयोग असून त्या कायदेशीर असल्याने त्यांत बरोबरीचे नातें ठीक रहाते. असल्या कमेट्या मुळे अधिकाऱ्यांचा तोरा व एकांगीपणा मोडेल व लोकांचीहि भीड चेपेल. ही भीड हिंदुस्थानांत फार आहे व त्यामुळे सुधारणा व सहकार्य होण्यास फार अडचण पडते. मोकळेपणा जो पाहिजे तो या मीडेमुळे येत नाही व नसता घाबरटपणा व बाऊ उत्पन्न होतो.