पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपोद्घात २५३ व या युद्धासाठी अनुयायांनी कष्ट सोसणे, मन आंवरून धरणे, व नियमित आचरण करणे या तीन गोष्टी करणे अवश्य आहे. काम करणाऱ्या निर्जीव यंत्राला सुद्धा या गोष्टी कराव्या लागतात मग स्वराज्य मिळवू पाहणाऱ्या समाजाला त्या कराव्या लागल्या तर त्यांत कांहीं आश्चर्य नाही. तप, दम व नियम हे सर्वत्र उपयोगी असे पडणारे वागण्याचे मार्ग आहेत. कोणत्याहि सरकारचे तीन मुख्य भाग असतात. (१) स्थानिक सरकार, (२) प्रांतिक सरकार व (३) मध्यवर्ति सरकार. या भागांना अनुसरून या खंडाच्या विवेचनाची विभागणी तीन भागांत केली आहे. स्थानिक सरकारांत गांवपंचायतीपासून जिल्हा लोकलबोर्डापर्यंत कोणत्या गोष्टी मिळविणे अवश्य आहे याचे विवेचन केले आहे. येत्या काउन्सिलापुढे गांवपंचायती व म्युनिसिपालिट्या यांचे कायदे मंजुरीकरितां येणार आहेत व लोकलबोर्डाचा मंजूर झालेला कायदा दुरुस्त करून घेतला पाहिजे. प्रांतिक सरकार या प्रकरणांत मुख्य गोष्ट म्हणजे सबंध राज्यकारभार आपले हाती येणे व यासाठी ही निवडणूक याच तत्त्वावर व्हावी व मग ही गोष्ट सर्व जगास पटली म्हणजे येत्या तीन सालांत कोणत्या गोष्टी व्हावयाला हव्या त्याचे विवेचन केले आहे. मध्यवर्ती सरकारच्या अडचणी सर्वांत जास्त आहेत. तरी त्यांत काय करता येण्यासारखे आहे हे सांगून हिंदुस्थानाला प्रांतानिहाय आर्थिक स्वातंत्र्य देण्यास संस्थानांची अडचण येणार नाही हे जाणून आर्थिक स्वातंत्र्याचा विचार एका स्वातंत्र अशा चवथ्या प्रकरणांत केला आहे. तात्पर्य, चालू परिस्थिति लक्षात घेऊन म्हणजे आत्मनिरीक्षण करून नजीकच्या तीन चार वर्षांच्या काळांत लोकांना कोणते हक्क मिळावेत असे वाटते त्या हक्कांचे स्वरूप सर्व लोकांपुढे असावे व त्या ध्येयाला अनुसरून ज्या ज्या गोष्टी आपण करणे इष्ट आहे त्यांचा निर्देश करणे हा या खंडाचा विषय आहे.