पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संघस्थापना कामाचा छंद किंवा नाद लागलेला पाहिजे. सभासद सरकारी नोकर असो, गरीब मजूर असो किंवा अंथरुणावर पडलेला रोगी असो, त्याला जर एखाद्या गोष्टीचा नाद असेल तर तो त्या बाबींत कांहीतरी करून दाखवील, अशी एका नादाची चार हौशी माणसें जमलीं म्हणजे त्यांनी संघ करावा, त्यांत जो अत्यंत छांदिष्ट व हट्टी असेल तो अध्यक्ष व जो जास्त चळवळ किंवा हालचाल करणारा असेल तो अमात्य नेमावा. म्हणजे संघाच्या कामाला नीट सुरुवात होईल व वळण लागेल. हल्लींच्या संघांचा दुसरा दोष म्हटला म्हणजे त्यांच्या सभा नियमितपणे होत नाहीत, वर्गणी नियमितपणे वसूल होत नाही वगैरे अनियमितपणा. पहिल्या दोषापेक्षाही हा दोष जास्त भयंकर आहे, कारण हा जास्त पसरलेला आहे. चार छांदिष्ट मिळणे जितके सोपे आहे तितकें इतर सभासदांचे आंगी नियमितपणा आणणे नाही. नियमित वेळी, नियमित माणसांनी, नियमित ठिकाणी जमणे व नियमित रक्कम न मागतां देणे हे गुण जर आपल्या हिंदी लोकांच्या अंगी आले तर निम्में स्वराज्य हस्तगत झाले असे समजावे. हिंदी लोक उत्तम नोकर आहेत. ताबेदार म्हणून ते नियमित आचरण निमूटपणे करतात पण स्वतंत्र म्हटले की, त्यांचा नियामितपणा जातो. स्वतःच्या पोट भरण्यापासून तो थेट अत्यंत महत्त्वाच्या कामापर्यंत त्यांचा अनियमितपणा अगदी निश्चित व नियमित आहे. हा अनियमितपणा घालविण्यासाठी तरुण मंडळींना लष्करी शिक्षण सक्तीचे पाहिजे. किंवा ताल धरूण गाणे व नाचणे शिकले पाहिजे, अनियमितपणा घातक कसा हे या विषयांतच चांगले समजते. या बाबतीत सुधारणा समंजस व थोर माणसांनी पहिल्याने केली पाहिजे. थोर माणसांना वेळेचे व नियमितपणाचे महत्त्व समजत असते व देशहितासाठी आपण हा मार्ग स्वीकारला पाहिजे ही गोष्ट त्यांना पटवितां येईल, ही गोष्ट पटली की, पहिला अमलांत आणावयाचा निर्णय म्हणजे हा. नेमल्या वेळी, नेमल्या ठिकाणी, नेमलेल्या मंडळींनी बिनचूक यायचे हीच गोष्ट पहिल्याने शिकावयाची व बोलल्याप्रमाणे वागावयाचें यांत संघाची इतिकर्तव्यता. त्याचप्रमाणे नियमित वर्गणी मागण्यास येण्याची अपेक्षा न ठेवता नेमल्या दिवशी, नेमल्या माणसाकडे पोंचती करावयाची.