पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० १ व त्यांनी वर दर्शविल्याप्रमाणे कामाचा पद्धतशीर उपक्रम व विस्तार केला पाहिजे. असा विस्तार करण्यासाठी पैसे हवेत हे खरे, पण आपण निरर्थक चैनीकडे कितीतरी पैसे खर्च करतो त्यांचा ओघ इकडे वळविला पाहिजे, भजी खाण्यांत, चहा पिण्यांत, सिनेमा पाहण्यांत व नटण्यांत जे सुख वाटते व मनोरंजन होते तितके तरी मनोरंजन होण्याइतकी गोडी संघाच्या कामांत उत्पन्न झाली पाहिजे, म्हणजे हेच पैसे तिकडे खर्च होतील, देशांतील हल्ली शिक्षित, शहाणे व पुढारी म्हणविणाऱ्या माणसांजवळ पैसे नाहीत असे नाही. त्यांनी मनावर घेतले तर पुष्कळ गोष्टी करतां येण्यापुरते पैसे त्यांच्याजवळ आहेत व आपल्या देशाचे हित व्हावे म्हणन त्यांनी आपले पैसे वर लिहिल्याप्रमाणे त्यांच्या आवडीच्या कोणत्या तरी बाबीची सांगोपांग चळवळ करणारा संघ स्थापण्यांत त्यांनी खर्च केले पाहिजेत. पुढाऱ्यांत ही जागृति उत्पन्न करावी म्हणूनच ही लेखमाला सुरू केली आहे. पूर्वीचे ब्राह्मण गरीब व विरक्त असत, म्हणजे ते आपले पैसे जनतेला ज्ञान देण्यांत खर्च करीत असत. घरे, शेते, दागदागिने करण्यापेक्षां देशहितासाठी, कोणत्या तरी आपल्या आवडीच्या एका बाबीसाठी आपली सर्व मिळकत, आपले व कुटुंबाचे पोट भरून उरलेली फाजील मिळकत याप्रमाणे खर्च करण्याची बुद्धि पहिल्याने पुढाऱ्यांत उत्पन्न केली पाहिजे. आपल्याकडील बहुतेक संघांचे काम पद्धतशीर होत नाही. कळकळ असो नसो, पैसे देवो न देवो, कोणातरी निर्गुण माणसाला अध्यक्ष नेमावयाचे, त्याच्या मदतीला एक अल्पगुणी अमात्य द्यावयाचा व त्यांच्या भोवती दहापांच जणांनी नाचावयाचे, ही हिंदुस्थानांतील साधारण संघाची रचना आहे. मग अशा संघांनी काम झाले नाही तर त्यांत आश्चर्य नसून असले थोतांडी संघसुद्धा काहीतरी काम करून दाखवू शकतात हेच आश्चर्य होय ! " रे खद्योता अतां तू चमक बघ तुझें दैव बा फार मोठे " या अन्योक्तीप्रमाणे काळ्याकुट्ट अंधःकारांत असले संघ करतात तें काम दिसते म्हणणेच योग्य होईल, पण या काजव्यापासून उष्णता किंवा शाश्वत उपयोगी असा प्रकाश पडणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना जी हौस असेल त्यांनीच त्या बाबीचा संघ स्थापावा. सभासदांना संघाच्या