पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० १ म्हणून जूट लवकर होत असे. हल्ली दर एक गांवांत व मोहल्यांत हिंदुमुसलमान याची खिचडी झाल्यामुळे जुटीचे काम कठीण झाले आहे. ज्या समाजाला आपण समर्थ असावे असे वाटते त्याने जगापेक्षां निराळी अशी आपली विशिष्ट घटना करावी लागते, अशा घटनेमुळे त्या समाजाच्या प्रत्येक घटकास आपला एकपणा, सहानुभूति व अभिमान वाटू लागतो व या आपलेपणासाठी आपले सामर्थ्य सर्वस्व खर्च करण्यास तो उद्युक्त होतो. प्रत्येक घटकांत अशी आपलेपणाची जाणीव उत्पन्न झाली म्हणजे तो समाज जिवंत समजावा. या जिवंतपणापासून त्या समाजाला थोरवी व वैभव प्राप्त होते. यासाठी हिंदी स्वराज्याचा प्रारंभ निरनिराळे संघ स्थापण्यापासून झाला पाहिजे, देश, प्रांत, जिल्हा, गांव व मोहल्ले इतक्या भागांत हे संघांचे जाळे पसरले पाहिजे. हे संघ कसे करावे म्हणजे जातवार, कां धर्मवार, कां स्थळवार, कां हितवार करावे याबद्दल मतभेद आहे. पण आम्हांला वाटते हे संघ धंदेवार करावे. पूर्वी जातवार आचार, विचार, पोषाक, धंदा अशी स्थिति होती व ती उत्तम होती. जूट होण्याला ही व्यवस्था फार सोईची होती. पण ती बाब आतां विस्कटली आहे; सबब आतां धंदेवार जूट करावी. या लोकांचे हितसंबंध, सुखदुःख साधारणपणे एक येत असल्यामुळे हे संघ सोईचे होतील. एक व्यवसाय करणारांचा एक संघ व या प्रमाणे सर्व देशभर संघ पहिल्याने स्थापन झाले पाहिजेत. कोणताहि संघ म्हटला की, त्यांत काही माणसे विचार करणारी, काही माणसें काम करणारी, काही माणसे मदत करणारी व इतर ठरल्याप्रमाणे वागणारी असावी लागतात. संघाला दरमहा थोडें उत्पन्न, एक कचेरी, विविक्षित काम, ते करण्याची ठराविक पद्धति व झालेल्या व करावयाच्या कामाची प्रसिद्धि करण्याची साधने इतकी सामुग्री पाहिजे. संघ स्थापन झाला की, त्या भागाची स्थिति व माहिती, इतर भागांशी त्या भागाची तुलना, परदेशच्या त्या कामाची माहिती व नव्या जुन्या ग्रंथांतून त्या कामासंबंधी मिळणारी माहितीहि गोळा केली पाहिजे. अशी माहिती गोळा होत चालली म्हणजे आपल्या उणीवा आपणास कळू लागतात व या उणीवा इतर लोकांनी कशा भरून काढल्या व त्यात त्यांस काय अनुभव आले हैं समजते. मग ह्या गोष्टी आपणांस कशा साध्य करता येतील याचा विचार सुरू