पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य स्थीरस्थावर झाल्यावर परदेशची चढाओढ फार होईल. मोठे काम हाती घ्यावयाचे म्हणजे दिरंगाई व सावकाशी उपयोगी नाही. यासाठी सरकारला स्वतः मोठे कर्ज काढावे लागेल व उद्योगधंद्यांसाठी कर्ज लोकांना द्यावे लागेल यांत संशय नाही. मात्र हे कर्ज प्रत्येक ठिकाणी सल्लागार मंडळे नेमून त्यांत सर्व हिंदीच लोक ठेवून त्यांचे मार्फतीने खर्च झालें पाहिजे. प्रांतिक सरकाराने आपल्या जबाबदारीवर प्रांतांत, बोर्डीनी आपल्या जबाबदारीवर जिल्ह्यांत व कमेट्यांनी आपल्या जबाबदारीवर शहरांत कर्जे उभारून खालपासून वरपर्यंत एका धोरणाने कामें चालली पाहिजेत. वर सांगितल्याप्रमाणे व्यवस्था केल्यास कर्ज मिळण्यास अडचण पडणार नाही. कामांची आंखणी दूरवर विचार करून एकदा कायदेमंडळाने मंजूर करावी. यासाठी लागणारे अधिकारी नेहमीप्रमाणे नेमावे व त्यांचा खर्च वार्षिक जमेंतून करावा. याप्रमाणे काम सुरू केल्या दिवसापासून पांच वर्षांत त्याचे फळ दिसूं लागेल व दहा वर्षांत तें चाखावयास मिळेल. सुधारलेल्या देशांत प्रत्येक बाबीचा अगोदरच उपयोग करण्यांत येत असल्यामुळे त्यांना मिळणारा फायदा कमी असणारच; पण ती स्थिति हिंदुस्थानाची नाही. या ठिकाणी मुबलक माल, स्वस्त मजुरी, उद्योगधंद्यांना वाव पुष्कळ आहे व म्हणून योग्य प्रयत्नाने हे झाड लवकर वाढून त्यास सुंदर फळे येतील. आज पाया घालण्यांत खर्च होणारी रक्कम कालांतराने कितीतरी पटीने फळ देईल; इतकेच नव्हे तर हे फळ दिवसेंदिवस वाढतच जाईल. ___ या ठिकाणी हे स्पष्ट सांगितलेले बरें की, हिंदुस्थानचे उद्योगधंदे ऊर्जितावस्थेस आणण्याचे काम हिंदी लोकांचे आहे. हे काम दुसरे लोक करतील हे संभवनीय नाही, दुसरे लोक हे काम करूं लागले तरी त्यांच्या हातून हे बरोबर होणार नाही. प्रत्येक हिंदी माणूस, मग तो स्त्री असो की पुरुष असो, हिंदी असो की मुसलमान असो, जहाल असो की मवाळ असो, त्याने हे माझें काम आहे, हे मीच केले पाहिजे, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणी हे करतां उपयोगी नाहीं, दुसऱ्याला मी हे काम करण्यासाठी शिल्लकच ठेवणार नाही अशी मनःपूर्वक भावना ठेवून या कामाला लागले पाहिजे, नोकरांवर सोपविण्याचे हे काम नव्हे व हल्लींची नोकरशाही तर या कामाला अगदी नालायक आहे ही गोष्ट चांगली लक्षांत