पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

________________


[२]

आहे ते आपण शांतचित्तें श्रवण कराल अशी मला आशा आहे.
 तरुण पिढीला विविध प्रकारची कर्तव्ये आहेत. त्यांत कौटुंबिक, नैतिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक अशी मुख्य आहेत. परंतु आपलें जीवित सुखमय कसे होईल, हा सर्वांत विचारार्ह प्रश्न आहे व त्याचे उत्तर तितकेंच व्यापक आहे. कारण स्वतःच्या मनास आनंद व सुख असले तरच जगांत वागणे सौख्यकारक वाटणार. ज्या कोणांशी म्हणून बोलण्याचा प्रसंग येतो त्यांचे मते आपणाला गृहसौख्य नाही असे म्हणणे पडते. प्रत्येकाची तीच कुरकुर कां असावी, याचा विचार केला म्हणजे पुरुषांचें जीवित सुखमय करणे जिच्या पूर्णपणे स्वाधीन त्या पत्नीचा दोष असला पाहिजे असें सहजच मनांत येतें. कॉलेजांत असतांना किंवा कॉलेज सोडतांना भावी आयुष्य कसें जाणार, यासंबंधी विद्यार्थ्यांच्या मनांत विचार येऊ लागतात. जशी ज्यांची परिस्थिति असेल तसा त्यांचा आयुष्यक्रम होणार हे तर निर्विवाद आहे. विशेषतः गृह सौख्यमय करण्याची गुरुकिल्ली ज्या पत्नीजवळ असते तिच्या योग्यतेवर सर्वस्वी भावी जीवित अवलंबून असावयाचे. तेव्हां तिच्यासंबंधी विचार केला पाहिजे, परंतु तो करण्यापूर्वी प्रथम आपल्या गृहस्थितीसंबंधी विचार करूं.