पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५१]


आहेत परंतु ती दिलीं कोणी ? आपणांस उत्पन्न केलें कोणी ? पुढे आपल्यास कोठे जावयाचें ? याबद्दल मुळीच विचार केला नाही, तर मोठाच कर्तव्यच्युतीचा दोष आपणांवर येईल. हा नरदेह अत्यंत अमूल्य आहे. यांत आयुष्याचे सार्थक झालेच पाहिजे. साधुसंतांनी म्हटल्याप्रमाणे :-
 " धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पहाहो।
 जो जो कीजे परमार्थ लाहो । तो तो कार्य सिद्धी ॥"
  विद्येचा खरा उपयोग तरी कोणता आहे ? या जगांत जें कांही आपले कर्तव्य आहे त्यांत ती विद्या किती उपयोगी पडेल हे पाहून आपणांस संपादावयाचे काय तें पाहिले पाहिजे. ईश्वरसिद्धि किंवा आपली आध्यात्मिक उन्नति हीच साधणे आहे. ज्या विद्येमुळे मनोभावांचा विकास होत नाही, अशुद्धता विराम पावत नाही, ती विद्या असली किंवा नसली सारखीच! 'काय ग्रंथ पढोन । एका ब्रह्मज्ञानावांचोन ' असें होतें. आपलें जीवित क्षणभंगुर आहे. या अल्पायुष्यामध्येच आपल्यास मोठी सिद्धि प्राप्त करून घ्यावयाची आहे. प्रस्तुतची स्थिति पाहिली तर विद्येचा उपयोग अशा रीतीने फारच थोडा होतो आहे. वास्तविक जुनेंही नाही व नवेंही नाही अशी अवस्था आहे. संध्येसही फांटा मिळाला व परमेश्वराचे शुद्धस्वरूप जाणण्याकडेही कल नाही, मग उन्नति कशी साधणार ?