पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५२]

कोणी कांहीं म्हटलें तर वाद व्हावयाचा. स्पेन्सर असें ह्मणतो, बर्गसन तसें ह्मणतो वगैरे. कोणी मानमान्यतेसाठी, कोणी मोठ्या चाकरीच्या लोभाने, कोणी अर्थार्जन जास्त होण्याच्या लालसेने जर धर्माची कास धरूं लागले तर अंतःकरणावर प्रकाश काय पडणार ? खरी भक्ति व तळमळ मनास पाहिजे. मग ईश्वरोपासनेची तऱ्हा कोणतीही असो. थोडक्यात सांगावयाचें ह्मणजे एवढेच की, 'अंतरी सबाह्य सारिखा निर्मळ ' अशी वृत्ति ठेवून 'जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा' ॥ या अभंगांत सांगितल्याप्रमाणे ईश्वरसेवा साधावी.
 शेवटी आपणांस एवढीच विनंति आहे की, ज्या जगनियंत्याने जन्मास घालून आपणांवर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, त्याचे विस्मरण न होऊ देतां, सदसद्विवेक बुद्धीला अनुसरून, आपले कर्तव्य योग्यप्रकारे बजावून भावि आयुष्य सुखमय करण्याचा प्रयत्न करावा. कुटुंब या शब्दाचा परिघ वाढवून, जनसेवेचे व्रत उचलून जगांत धन्य धन्य म्हणवून घ्या ! तो जगदात्मा आपलें सदैव मंगल करो, हीच आकांक्षा प्रदर्शित करून मी आपली रजा घेतें.