पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५०]


पाहिजे. आपला विचार, उच्चार, व आचार यांत इतका मेळ असला पाहिजे की, आपल्याविषयीं यत्किंचितही शंका घेण्यास कोणासही कारण राहूं नये. प्रायः ज्या प्रकारची वर्तमानपत्रे विद्यार्थ्यांच्या हाती पडतात त्या प्रकारची त्यांची मतें बनतात, म्हणून प्रागतिक-ज्यांत विचारांचा निर्दोषपणा आहे, अशीच वर्तमानपत्रे वाचण्याकडे प्रवृत्ति ठेवावी. विद्यार्थिदशेत राजकीय विषयांसंबंधी आपली मते ठाम ठरवून ठेवू नयेत. काळ व परिस्थिति यांस अनुसरून ती असावी. साधक बाधक प्रमाणांचा शांतपणाने विचार करण्याची संवय ठेवावी. केव्हां केव्हां पित्याची मतें प्रागतिक तर पुत्राची मते जहाल अशा प्रकारची चमत्कारिक परिस्थिति उत्पन्न होते. ती जनदृष्टीस तरी किती विलक्षण वाटते ! म्हणून कोणत्याही प्रकारच्या अशा विचारांस मनांत थारा न देतां कायेनें, वाचेनें व मनानेंही आपण राजनिष्ठ रहाल असा मला पूर्ण भरंवसा आहे.
  आतापर्यंत जो विचार झाला तो ऐहिक गोष्टींविषयी झाला. पारमार्थिक बाबीसंबंधी आपण कांहींच विचार केला नाही. वास्तविक आयुष्यातील परमश्रेष्ठ कर्तव्य तेच आहे. ते जर बजाविलें नाहीं तर 'नोळखे कदा जो आपुलिया पित्या । सार्थक तें जित्या काय त्याचे ॥ १ ॥' अशी स्थिति होईल. सर्व प्रकारची सुखें मिळत