पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४८]


असावा. कित्येक वेळां मधल्या माणसांच्या चहाडखोरपणामुळेसुद्धां स्नेहभंग होतो. अशा वेळी मन एकदम प्रक्षुब्ध होऊ न देतां सारासारविचार करून शांत व स्थिर चित्ताने सत्य व असत्य यांची निवड करावी. संशयी व मत्सरी यांच्याशी कदापिही मैत्री करू नये. आपण ज्याला मित्र म्हणणार तो निर्मळ मनाचा व विश्वासपात्र असा असला तरच त्याच्याशी स्नेह करावा. नाही तर आपला विश्वासघात झाला असतांना आपल्यास जें दुःख होतं तें अपरिमित होय! सन्मित्र वास्तविक चिंतामणीप्रमाणे, तो जोडणें अवश्य आहे. परंतु सर्वांना तो मिळण्याइतके ते भाग्यवान् नसतात. असो.
 सामाजिक कर्तव्यासंबंधी विचार करूं. ज्या समाजांत मनुष्यप्राणी जन्मास येतो त्यासाठी त्याची विविध प्रकारची कर्तव्ये आहेत. हा देह आपल्या कार्यासाठीच केवळ नसून लोकांच्या हितार्थही त्याचा उपयोग केला पाहिजे. 'आला आला प्राणि जन्मासि आला । गेला गेला बापुडा व्यर्थ गेला' असे आपल्या जन्माचे होऊ नये. इतरांच्या उपयोगाकरितां आपला देह झिजला पाहिजे. स्वतःच्या गरजा सर्वजण भागवितात. स्वतःच्या सुखार्थ सर्वांचाच प्रयत्न असतो. परंतु इतरांचे दुःख हरण करीन, इतरांच्या उपयोगी पडेन, समाजांतील व्यंगें, अनिष्ट चाली नष्ट करीन, आपल्या समाजास उच्चतम अवस्था प्राप्त करून देऊन त्याची