पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४६]


दुर्मार्गाकडे वळवितात; त्यांच्या नादी लागले की, आयुष्याची होळी झालीच. मग सुखाचा किरणसुद्धा प्राप्त व्हावयाचा नाही. कित्येक मित्र म्हणवून फशी पाडणारे 'परोक्षे कार्यहंतारं प्रत्यक्षे प्रियवादिन ' या कोटींतले असतात. प्रायः मनुष्याची परीक्षा तो ज्या मंडळींत उठतो बसतो, जी त्याची मित्रमंडळी असते, त्यांच्यावरून करतात. त्यामुळे ताडीच्या झाडाखाली बसून दूध प्राशन केल्याप्रमाणे मन कितीही शुद्ध असले तरी चालत नाही. वास्तविक सहवासाचा परिणाम मनुष्यावर होतोच, हा नियम आहे. 'पुष्पसंगें मातीस वास लागे। मृत्तिकेचा पुष्पांत गुण न वागे ॥' असा सत्संगतीचा महिमा आहे. तथापि मृत्तिकेचा पुष्पाशी संबंध घडला तर फुलांचा सुवास कांहीं तरी कमी झालाच पाहिजे. म्हणून मित्र संपादन करणे फार जोखमीचे आहे. मनुष्याची पारख चांगलीच झाली पाहिजे. कित्येक वेळां आपण सरळ बोलतों किंवा सरळ रीतीने वागतों असें आपणांस वाटतें व आपली सदसद्विवेकबुद्धिही तसेंच सांगते, परंतु त्याचा अर्थ जगांत विपरीत होण्याचा संभव असतो.
 कित्येक मित्र फार चांगले असतात. त्यांचा रहस्यस्फोट आपल्या हातून केव्हाही होऊ देऊ नका. त्यांच्याशी एकनिष्ठेने वागा. एकदां स्नेह जडला की तो वास्तविक तुटू नये. दोन मित्रांपैकी एक जर दुर्जन असला तर