पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४५]

युरोपियन बनण्याकडे असल्यामुळे जात ओळखण्याची पंचाईत पडू लागली आहे. कारण संभाषण व्हावयाचें तें इंग्लिशमध्ये. त्यामुळेही जातीबद्दल बोध होण्यास साधन नाही. ब्राह्मण, सिंधी, पारशी, मुसलमान बेंगाली, गुजराथी सर्वच सारखे दिसतात. तेव्हां पाश्चिमात्य पोषाख जरी सोईचा वाटला तरी प्रत्येकानें शिरोभूषणांत तरी राष्ट्रीयत्व कायम ठेवण्याचा कृतनिश्चय केला पाहिजे.
 या पाठशाळेत आपणांस जन्म घालवावयाचा नाही, हे तर निश्चित आहे; परंतु जगाच्या मोठ्या पाठशाळेत आपणांस प्रवेश करावयाचा आहे, त्यांत संसारांत पडल्यावर नानाप्रकारचे प्रसंग यावयाचे आहेत. त्यांतून पार कसे पडावे, म्हणून कित्येक वेळां अंतःकरणाची त्रस्तता अनुभवास येणार आहे. तऱ्हेतऱ्हेच्या लोकांशी प्रसंग येतील. त्यांत चांगलें कोण व वाईट कोण यांची निवड बरेच वेळां चुकेल. कॉलेजांतील मित्र हे जन्मभर मित्र रहाणार आहेत असे नाही. हे कधी काळी योगायोगानें दृष्टीस पडावयाचे व भेटावयाचे. आपणांस वाटतें सर्वच गोड बोलणारे तेवढे मित्र; परंतु कित्येक स्वार्थसाधु व आपमतलबी असतात ते आपला कार्यभाग उरकला की यःपलायन करतात. कोणी कोणी संपत्तीच्या दिवसांत स्नेही ह्मणवितात; विपत्ति आली की, वाऱ्यासही उभे रहावयाचे नाहींत. कित्येक नीतिभ्रष्ट करण्यांत तरबेज असतात. ते