पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४३]


जागा ठेवू नये. विद्यार्थिदशा संपल्यावर शक्य तितक प्रवास करावा व एरव्हीही सृष्टि व तिची बालके यांचें सूक्ष्म निरीक्षण करून चतुरस्रता संपादन करावी. आपणांत जी धमक राहील त्या मानाने सत्कृत्ये आपल्या हातून घडतील. हल्ली विद्वत्तेच्या दृष्टीने ग्रॅज्युएटांची जी योग्यता २५ वर्षांमागें होती तशी नाही, याचे कारण काय बरे असावें ? एखादेच न्यायमूर्ति रानडे किंवा नामदार गोखले कां निपजावे ? जास्त कां निपजूं नयेत ? वास्तविक ज्ञानाकरितां शिकावयाचे आहे. कॉलेज सोडलें की, दिली पुस्तकांना रजा, असें उपयोगाचें नाहीं, जे युनिव्हर्सिटींत चमकतात अशा पदवीधरांना काही वर्षांनी एखादा प्रश्न आला तर ते आपले कोरे, असे होऊ नये. ग्रंथवाचनाचा व्यासंग व निदिध्यास सारखा चालूं पाहिजे. वास्तविक कॉलेज सोडल्यावर खऱ्या विद्यार्थिदशेला प्रारंभ होणार आहे. या जगाच्या रंगभूमीवर किती तरी महत्कार्ये आपणांस करावयाची आहेत. आपल्या देशाकरितां स्वार्थत्याग करावयाचा आहे, उन्नति साधावयाची आहे. पुष्कळांची समजूत आहे की, विद्या हे चरितार्थाचे साधन आहे, नौकरीकरितां शिकावयाचे, परंतु तसे नाही. एका दृष्टीने ते असले तरी मनुष्यास आयुष्यभर विद्यार्थिदशा असावी. उत्तम विषयांचा व्यासंग सदैव चालू ठेवावा. अकाल्याचे रा. ब. महाजनी यांची योग्यता आपणांस माही-