पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२४]


येते. गृहस्थितीत ज्याप्रमाणे इष्ट सुधारणांचें अवलंबन केले पाहिजे त्याप्रमाणे स्त्रियांच्या योग्यतेतही फरक झाला पाहिजे. पुरुष ज्या विद्यानंदसाम्राज्यात विहार करीत असतात त्याचा एक सहस्रांशसुद्धा त्यांच्या पत्नीला ठाऊक नसतो. पुरुषांना मिल्टन, शेक्सपियर यांचा पूर्ण परिचय, परंतु तेंच त्यांच्या पत्न्यांना कशाशी खावयाचें हे माहीत नसते. या पुण्यासारख्या शहरी किंवा मुंबईस चार स्त्रिया सुशिक्षित दिसल्या, किंवा तुमच्या व्यवसायभगिनी रात्रंदिवस तुमच्या बरोबरीने येथे अभ्यास करीत आहेत त्यांच्यावरून सर्व जगाची परीक्षा करू नका. सर्वच स्त्रियांना ग्रॅज्युएट होण्याची जरूर आहे असे माझं मत नाही. ज्यांना उमेद आहे, हौस आहे व परिस्थिति अनुकूल आहे, त्यांना ग्रॅज्युएट होण्यास प्रत्यवाय नाही. पर संसार करणे हेच जन्मास येऊन बहुतेकींचे ध्येय असल्यामुळे सुगृहिणी व सुमाता होण्यास योग्य असेंच शिक्षण प्रत्येक स्त्रीस मिळाले पाहिजे. कारण अविवाहित रहाण्याचा ज्यांचा निर्धार आहे अशा मुली आपल्यात फार थोड्या आहेत. बहुश्रुतपणा उत्पन्न करणे व सर्व विषयांची सांगोपांग माहिती स्त्रियांना करून देणे, हे पुरुषांचेच काम आहे. राष्ट्राची भावि उन्नतीसुद्धा स्त्रियांच्या ज्ञानसंपन्नतेवर अवलंबून आहे, म्हणून आपणांस एका आधुनिक कवींच्या शब्दांत येवढेच सांगणे आहे की:-