पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२२]


सर्वस्वी नडते आहे. स्त्रियांच्या योग्यतेविषयीं महाभारतांत म्हटले आहे की:-

 "अर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमः सखा।
 भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यतः ॥"
 म्हणजे "भार्या ही मनुष्याचे अर्धांग आहे. भार्या ही उत्तम मित्र आहे. धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांची मूळ भार्याच आहे. आणि भार्येच्या योगानेच मनुष्य हा संसारसमुद्र सहजगत्या तरून जातो. " ग्रंथाधारें स्त्रियांना आपली योग्यता समजून देणे व वास्तविक ती तशी असणे यांत फरक आहे. कारण त्यामुळे त्या प्रशंसनीय बनत नाहीत, ती साधनें भिन्नच आहेत. याचा विशिष्ट उपयोग असेल तर एवढाच आहे की, स्त्रियांना आपल्या योग्यतेचे जें विस्मरण झालेलें आहे तें नष्ट होण्यास ग्रंथवचनें कारणीभूत होतात. एका सिंहाच्या छाव्याची जी गोष्ट आहे की, तो जन्मल्यापासून मेंढरांच्या कळपांत वाढला. त्यामुळे जातिस्वर भाव अगदी विसरून गेला होता व निरुपद्रवी बनला होता, परंतु त्याच्या मूळ स्वरूपाचा परिचय कोणी करून देतांच तो एकदम उग्र बनला व वनराज या संज्ञेस पात्र झाला. सांगावयाचें म्हणून इतकेंच की, स्त्रियांची लुप्त झालेली योग्यता पुनः त्यांना प्राप्त करून देणे हे पुरुषांचे विशेषतः तरुण पिढीचे कर्तव्य आहे. कित्येक वेळां