पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२१]


फुरसतीच्या वेळचें करमणुकीचे साधन आहे. याखेरीज तिला विशेष मूल्य नाही असे मानण्याकडे प्रवृत्ति होते आणि ह्मणून तिला अक्षरशत्रु ठेवण्याकडे अशा माणसांचा कल होतो. कारण ती विद्वान् झाली तर आपला पुरुषार्थ गाजवितां येणार नाही अशी त्यांना भीति असते. कित्येक वेळां स्त्रियांचा दोष असतो, नाहीं असें नाही, परंतु पुरुषांनीही स्त्रियांचा विश्वास संपादन करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. कारण पत्नीशी तुटकपणा असला म्हणजे तिलाही पतीविषयी तितका अनादरभाव जरी नाहीं तथापि कमीपणा वाटू लागतो-बाकी पतीविषयीं अप्रेमबुद्धि बाळगण्याचे आमच्या हिंदु स्त्रियांचे शीलच नाहीं-तथापि त्यांच्या सद्गुणाची किंमत झाली नाही तर त्यांना दुःख झाल्यावांचून रहात नाही.
 एकंदरीने पहातां स्त्रियांची प्रस्तुतची स्थिति समाधानकारक नाही. त्यांत सुधारणा होणे अगदी अवश्य आहे. मुख्य कारण असे की, स्त्रियांना आपल्या स्थितीची अगदी पूर्ण संवय होऊन गेलेली आहे, त्यामुळे त्यांची वास्तविक योग्यता काय आहे व प्रस्तुत त्यांना किती अवनत दशा आलेली आहे हे त्यांच्या कांही लक्षात येत नाही. एकतर गतानुगतिकत्वाकडे मनाचा पूर्ण ओढा, व अंधपरंपरेनें, जें चालत आले आहे ते तसेंच पुढे चालू ठेवण्याची बुद्धि ही