पान:भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१३]

वरांस भोगावे लागतात. या गोष्टी तरुणांस कळत नसतात असे नाही, परंतु ते डोळेझांक करतात किंवा त्यांना करणे भाग पडते. या हुंड्याच्या चालीमुळे, समजा एखादा पिता गरीब आहे व त्याला ५।६ कन्या आहेत तर त्यांना त्याने मिळतील तशा वरांना देऊन मोकळे झाले पाहिजे, विहिरीत ढकलले पाहिजे, किंवा ग्रामत्याग तरी केला पाहिजे. त्यांच्या विपत्तीची कल्पना तुम्हां तरुणानांच असली पाहिजे. यामुळे सद्गुणांची किंमत होत नाही. विजोड संबंध जडतात. वास्तविक 'सोय जाणे तो सोयरा' असे म्हटलेलें आहे परंतु सोयरे म्हणजे परस्परांच रिपु होतात. याशिवाय मंगलकार्यातून होणारे नायकिणींचे नाच यांना अजीबात फांटा दिला पाहिजे. हे काम तरुण पिढीचेच आहे. थोडासा निग्रह व नेट अंगी असला म्हणजे झालें. ज्या समयीं दोन जीवात्मे परस्परांशी संलग्न होतात, अशा पवित्र प्रसंगी पतित जनांचे दर्शन किती त्याज्य समजले पाहिजे ? परंतु नाहीं-यास तर प्रमुख स्थान ! गवयांचे गाणे नाहीतर अलीकडे निघालेले ग्रामोफोन यांचा उपयोग अशा वेळी अत्यंत आल्हादकारक होईल. ज्यांचे विवाह होऊन चुकले आहेत, त्यांच्या स्वतःच्या नाही, परंतु, बंधु, आप्त गणगोत यांच्या विवाहप्रसंगी त्यांनी ही चाल प्रचारांत आणावी व ज्यांचे विवाह होणे असतील त्यांनी प्रथम स्वतःच्या लग्नांत हा हेका