________________
गया, श्रावस्ती, व कपिलवस्तु ही शहरें मात्र या वेळेस भरभराटीच्या स्थितीत नव्हती. याचे कारण काय असेल तें समजत नाही. विक्रमादित्यानंतर त्याचा मुलगा कुमारगुप्त हा गादीवर आला. (इ० स० ४ १३ ) त्याच्या कारकीर्दीत राज्यविस्तार कांहीं कमी झाला असेल असे दिसत नाही. कारण, आपल्या आजाप्रमाणे त्यानेही अश्वमेध यज्ञ केला. त्याचे कारकीर्दीचे शेवटीं हूण लोकांच्या टोळ्यांची धाड वायव्येकडून हिंदुस्थानांत आली. त्याचा बराचसा अनिष्ट परिणाम कुमारगुप्ताच्या राज्यावर झाला. कुमारगुप्त इ० स० ४५५ त मृत्यु पावला. त्याचा मुलगा स्कंदगुप्त त्याच्या गादीवर बसला. थोड्याच दिवसांत मध्य आशियाच्या मैदानांतून निघून हिंदुस्थानच्या वायव्य दिशेच्या डोंगरांतून हूण लोकांच्या झुंडीच्या झुंडी स्कंदगुप्ताच्या राज्यावर उतरल्या. परंतु त्यांचा त्याने मोड केला. या जयाच्या संबंधाने त्याने एक मोठा स्तंभ उभारला. त्याच्या माथ्यावर विष्णूची मूर्ति बसविली व ईश्वराच्या कृपेनें रानटी लोकांच्या तडाक्यांतून आपल्या देशाची कशी सुटका झाली याचे वर्णन त्या स्तंभावर लिहिले. तो स्तंभ गाझीपुर जिल्ह्यांत काशी क्षेत्राच्या पूर्वेस भीतरी या गांवीं अद्याप उभा आहे. त्यावरील विष्णूची मूर्ति मात्र नाहींशी झाली आहे. दुसऱ्या एका लेखांत ४५७ साली रानटी लोकांचा पराभव झाल्याचे लिहिले आहे व त्यांत काठेवाड प्रांतावर स्कंदगुप्ताचा पूर्ण अंमल असल्याचे लिहिले आहे. त्या प्रांताचा प्रतिनिधि पर्णदत्त नांवाचा होता. त्याच्या मुलाने गिरनार पर्वताजवळील तलाव दुरुस्त केला. इ० स० ४६५ सालापर्यंत स्कंदगुप्ताचे राज्य चांगल्या व्यवस्थेने चालले होते, असें बुलंदशर जिल्ह्यांतील एका सूर्यनारायणाच्या देवळाला केलेल्या दानपत्रावरून दिसते. परंतु त्याच