________________
मैलांचा प्रवास केला. त्या प्रांतांत बौद्ध धर्माचे पुष्कळ मठ होते व त्यांत हजारों भिक्षु राहात असत. माळव्याचे वर्णन देतांना फाहिएन म्हणतो की, येथील लोक फार सुखी आहेत. त्यांच्या सरकारापासून त्यांना काही त्रास होत नाही. परगांवीं जातांना कांहीं परवाने लागत नाहीत, किंवा आपल्या घरांची किंवा घरांतील माणसांची नोंद करावी लागत नाही. बहुतेक गुन्ह्यांना दंडाची शिक्षा असे. बंडवाल्यांना उजवा हात तोडण्याची शिक्षा असे. कबुलीकरितां कैद्यांना मारण्याची वहिवाट नाही. सरकारचे उत्पन्न बहुतेक काळींचे होते; व अंमलदारांना सरकारांतून पगार असल्यामुळे, रयतेला तसदी होत नसे. बौद्ध शास्त्रांतील अहिंसा धर्म सर्वत्र पाळीत असत. कोणी दारू पीत नाही, किंवा कांदे, लसूण खात नाहीत. काश्मीरचा गोपादित्य राजा ब्राह्मणाने लसूण खाल्ल्यास त्यास शिक्षा देत असे.' हिंसा करणारे लोक काय ते चांडाल जातीचे होते. नेहमींचे वापरण्याचे नाणे कवड्यांचे होते. बौद्ध मठांना राजाकडून चांगल्या नेमणुका असत. ते कोठे गेले तरी राहण्याची, जेवण्याखाण्याची व अंथरुणपांघरुणाची त्यांना अडचण पडत नसे. या फाहिएनच्या वर्णनावरून, चंद्रगुप्त विक्रमादित्याचे राज्य सुव्यवस्थेत होते व राजाकडून प्रजेला कांहीं उपाधि होत नव्हती असे दिसते. त्यांनी आपापल्या परीने उद्योग करून संपन्न व्हावे अशी राज्यव्यवस्था होती. या विक्रमादित्याच्या वेळेस हिंदुस्थानची राज्यव्यवस्था पौर्वात्य दृष्टीने जितकी चांगली होती, तितकी प्राचीन काळी कधीहि झाली नाही. प्रजेच्या कारभारांत तो होता होईल तितका कमी हात घालीत असे. १ राजतरंगिणी, स्टीनचे भाषांतर-खंड १ पृष्ठ ३४२ (स्मिथचा इतिहास, पृ. २९७.)