________________
असलेलें कार्तिपूर म्हणजे सांप्रतचे कमाउन, अलमोरा, गरवाल व कांग्रा प्रांत. पंजाब, माळवा, व पूर्व राजपुताना ह्या प्रांतांत तेथीलच लोकसत्तात्मक संस्था होत्या. __ अशोकानंतर इतकें विस्तृत राज्य समुद्रगुप्ताचेच झालें, व त्याचेकडे गांधार व काबूल देशांचा कुशान राजा, व आक्सस नदीवरील त्याच जातीचा बलाढ्य राजा यांचेकडून व सिंव्हलद्वीप वगैरे ठिकाणांतून वकील येत असत. सिंव्हलद्वीपचा राजा मेघवर्ण ह्याने आपल्या भावास समुद्रगुप्ताकडे वकील म्हणून पाठविले. त्याचा तेथें मान नीट न राहिल्यामुळे, मेघवर्णानें जवाहीर वगैरेंचा नजराणा बरोबर देऊन दुसरा वकील पाठविला. व हिंदुस्थानांत मठ बांधण्याची परवानगी मागितली. ती मिळाल्यावर गयेंतील बोधिवृक्षानजिक उत्तरेस तीन मजल्यांचा त्याने एक भव्य मठ बांधला व त्यांत बुद्धाची रत्नजडित सोन्याचांदीची मूर्ति बसविली. पुढे सातव्या शतकांत हिऊएनत्संग आला तेव्हां महायान स्थविरपंथाचे हजार भिक्षु ह्या मठांत होते, हल्ली त्या ठिकाणी एक टेंकाडासारखा उंचवटा आहे. . समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला. पुष्पमित्रानंतर आजपर्यंत तो कोणी केला नव्हता. ह्या प्रसंगी समुद्रगुप्ताने लक्षावधि ब्राह्मणांस चांदी सोन्याच्या नाण्यांची दक्षिणा दिली. त्यावेळेस पाडलेल्या नाण्यांपैकीं, कांहीं नाणी सांपडलेली आहेत. त्यांवर होमकुंड काढलेले असून त्याच्यासमोर यज्ञाचा अश्व उभा आहे, असे दाखविलें आहे. याशिवाय एक दगडाचा ओबडधोबड घोडा उत्तर अयोध्या प्रांतांत सांपडला आहे. तो लखनौच्या संग्रहालयांत ठेविला आहे. तो या अश्वमेधाच्या प्रसंगी केला असावा अशी समजूत आहे. समुद्रगुप्ताची आणखी काही सोन्याची नाणी सांपडली आहेत.