________________
त्यांची मुले ओलीस घेतली. त्यांत एक चीनच्या मांडलिक राजाचा मुलगा होता. या वेळेपासून चीन देशांत बौद्ध धर्माची स्थापना झाली. ओलीस घेतलेल्या राजपुत्रांस ऋतुमानाप्रमाणे योग्य अशा ठिकाणी वेगवेगळ्या बौद्धांच्या मठांत कनिष्काने ठेवले. ते पूर्व पंजाबांत चीनभुक्ति नांवाचे ठिकाणी रहात असतां पियर व पांच ह्या फळांची लागवड हिंदुस्थानांत त्यांनी प्रथम केली. एका राजपुत्राने देशी परत जातांना कपिश शहरांतील मठाला मौल्यवान जवाहिराची देणगी दिली. ती देणगी वैश्रवणाच्या मूर्तीच्या पायांखालीं पुरून ठेविली होती. मठांतील भिक्षूपैकी कोणी ती काढावयास गेल्यास भूत-पिशाच्च त्याच्या दृष्टीस पडत. हि-उएन-त्संग हा तेथे गेला तेव्हां त्यास तेथील लोकांनी विनंति केल्यावरून त्याने मठाच्या संरक्षक भूताची, त्या देणगीचा अपव्यय केला जाणार नाही अशी खातरी केली, व धूपदीप जाळून ते जवाहिर काढले. तेव्हां त्या कामगारांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. सात आठ फुटांखाली तांब्याचा एक मोठा हंडा सांपडला. त्यांत शेंकडों शेर सोने व पुष्कळ मोती सांपडली. कनिष्काने बौद्ध धर्माचा स्वीकार कोणत्या साली केला हे नक्की समजत नाही; परंतु इतकें खास दिसते की, तो गादीवर बसला तेव्हां त्याचा बौद्ध धर्म नव्हता. कारण त्याच्या आरंभीच्या नाण्यांवर सूर्य व चंद्र यांचे ठसे असून त्यांची नांवें ग्रीक लिपीत लिहिली आहेत. नंतरच्या नाण्यांवर ग्रीक, इराणी व हिंदुच्या देवांची चित्रे आहेत. शेवटी शेवटी पाडलेल्या नाण्यांवर मात्र बौद्ध शाक्य मुनींचे पुतळे आहेत. कनिष्क बौद्ध धर्माचा अनुयायी झाला. तथापि हिंदु देवांचीही तो पूजा करीत असे. कनिष्कानें