________________
वर उभे केले. त्यांच्या आठ रांगा केल्या. ह्या हत्तींच्या मागें तीस हजार पायदळ सैन्य उभे केले. दर दोन हत्तींच्या दरम्यान पायदळाच्या टोळ्या उभ्या केल्या. पायदळाच्या दोन्ही बाजूस चार हजार घोडेस्वार व तीनशे रथ ठेविले. दर एक रथाला ४ घोडे होते व आंत सहा जवान होते; त्यांपैकी दोन बाजूस दोन तिरंदाज होते, दोन ढालवाले होते व दोन सारथि होते. पायदळाजवळ रुंद पात्यांच्या तरवारी असून ढाला होत्या व शिवाय एकेक तिरकमठा व प्रास अशी हत्यारे होती. जमीन घट्ट नसल्याकारणाने, तिरकमठा जमिनीवर ठेवून दोरी ओढण्यास कठीण जात असे. ह्याप्रमाणे आजपर्यंतच्या जगतांतील कुशल योद्धयांपैकी एका श्रेष्ठ योद्ध्याशी लढाई करण्यास पोरस राजा सिद्ध झाला. लढाईच्या आरंभी शिकंदराने तिरंदाज घोडेस्वार पोरस राजाच्या डाव्या अंगच्या तुकडीवर पाठविले. त्यांनी बाणांचा सारखा भडिमार केला. त्यांच्या मागोमाग शिकंदर स्वतः घोडेस्वार घेऊन आला. डाव्या बाजूच्या तुकडीवर याप्रमाणे फार जोराचा मारा झालेला पाहून पोरस राजाच्या उजव्या बाजूची फौज त्यांचे मदतीस धावून जाऊ लागली. परंतु इतक्यांत शिकंदराने कोइनोस ह्याच्या हाताखाली ज्या दोन पलटणी ठेविल्या होत्या त्या फौजेच्या समोरून दौड करून उजव्या हाताच्या तुकडीवर पडल्या. त्या दोन पलटणींना हरकत करण्याकरितां म्हणून पोरसचे घोडेस्वार आपले तोंड पालटावयास लागले; अर्थात् त्यामुळे पहिल्या व्यवस्थेत घोटाळा झाला. शिकंदराने ही संधी पाहून त्यांच्यावर जोराने हल्ला केला. त्यामुळे पोरसच्या घोडेस्वारांचा घोटाळा होऊन ते हत्तींच्या बाजूला आश्रयाकरितां आले. हत्तीच्या महातांनी मॅसेडोन लोकांच्या घोडेस्वारांवर हत्ती रेटले. मॅसेडोनच्या रांनी हत्तीच्या महातांवर व हत्तीवर बाणांचा सारखा वर्षाव केला.