________________
नेमले. सोढलाचा मुलगा शारंगधर याने संगीतरत्नाकर नांवाचा संगीत शास्त्रावर ग्रंथ लिहिला आहे. सिंघण राजाने या ग्रंथावर टीका लिहिली आहे. सिंघणचा मुख्य ज्योतिषी भास्कराचार्याचा नातू चांगदेव हा होता. त्याने आपल्या आजाच्या सिद्धांत शिरोमणि नांवाचे ग्रंथांचा अभ्यास करण्याकरितां चाळिसगांव भागांत पाटणा येथे एक मठ बांधला. सिंघणानंतर त्याचा नातू कृष्ण गादीवर बसला. त्याचा लक्ष्मीदेव नांवाचा मंत्री होता. तो हत्तीपथकाचा सेनापतिहि होता. शिवाय त्याने सूक्तिमुक्तावलि नांवाचा निवडक संस्कृत कवितांचा संग्रह केला आहे. त्याचा ज्येष्ठ बंधु मल्ल ऊर्फ मल्लिसेठी नांवाचा होता. ह्याने कृष्णराजाचे संमतीने बागेवाडी गांवांतील जमीनी वेगवेगळ्या गोत्रांच्या बत्तीस ब्राह्मणांस दान दिल्या. या ब्राह्मणांपैकी कांहीं पटवर्धन व पैसास या उपनांवांचे आहेत व कांहीं घळिसास, घळिस, व पाठक उपनावाचे आहेत. अमलानंदाने याच राज्यांत वेदांत कल्पतरु नांवाच्या वाचस्पतिमिश्राचे भामति ग्रंथावर टीका लिहिली. हा भामति ग्रंथ शंकराचार्यांचे वेदांत सूत्रभाष्यावर टीकात्मक आहे. कृष्णानंतर त्याचा भाऊ महादेव हा इ० स० १२६० त गादीवर बसला. त्याने कोंकणचा राजा सोम ऊर्फ सोमेश्वर याचा पराभव करून कोंकण आपले राज्यांत सामील केले. महादेवानंतर त्याचा मुलगा जरी काही वेळ राज्य करीत होता, तरी थोड्याच काळाने गादीचा योग्य स्वामी म्हणजे कृष्णराजाचा मुलगा रामचंद्र हा सिंहासनारूढ झाला. त्याला रामदेव किंवा रामराजा असे म्हणतात. त्याने सत्तावन ब्राह्मणांना तीन गांवें अग्रहार दिली. दानपत्रांत लिहिले आहे की, दान दिलेली जमीन कोणास गहाण देऊं नये;