________________
त्याला कैद केले. पण पुढे त्याने त्याला सोडूनहि दिले. (इ. स. ९७५)परंतु इ० स० ९९५ चे सुमारास हा तैलप राजा मोठी फौज घेऊन मुंजाचा सूड उगवण्याकरतां माळव्यांत शिरला. मुंजाचा प्रधान रुद्रादित्य याने तैलपाशी युद्ध न करण्याबद्दल मुंजास पुष्कळ सांगितले.परंतु त्याचे न ऐकतां मुंजराजा तैलपाच्या देशांत चालून गेला. तेथे त्याचा पूर्ण पराभव झाला. व तैलपाने त्यास कैद केले. आरंभी मुंजाची तैलप राजाने चांगली बरदास्त ठेविली, परंतु तैलपाची बहीण कुसुमावती ऊर्फ मृणालवती हिचे मुंज राजावर प्रेम जडले व तिच्या साह्याने आपली सुटका करून घेण्याचा यत्न केला. मृणालवतीने ही गोष्ट तैलप राजास कळविली, तेव्हां त्याने मुंज राजाचा शिरच्छेद केला. मुंज राजा शिवभक्त होता. तो सारखा स्वाऱ्या व लढाया करण्यांत गुंतला होता, तरी त्याने पुष्कळ इमारती व तलाव बांधले. धारेजवळील मुंजसागर व मांडू येथील मुंज तलाव, हे त्याने बांधिले. मांधाता, महेश्वर, व कुब्जासंगम येथील घाट त्यानेच बांधिले. उज्जनी व धारशहरांतही त्याने सुंदर इमारती बांधिल्या ह्याचे दरबारांत पद्यगुप्त, हलायुध,धनपाल, व धनंजय आणि धनिक हे दोघे बंधू ही विद्वद्रत्ने होती. धनपाल हा जैन कवि होता. पद्यगुप्ताने नवसाहसांकचरित्र नांवाचे काव्य लिहिले. ____ धनंजयाने दशरूप नांवाचा नाटकावर ग्रंथ लिहिला.त्याचा भाऊ धनिक याने दशरूपावलोक नांवाची त्या ग्रंथावर टीका लिहिली. मुंजाला मुलगा नसल्या कारणाने त्याचा भाऊ सिंधुराज गादीवर बसला. त्याला नवसाहसांक, कुमार, नारायण, व कुंज अशीही नांवे होती. तो स्वभावाने फार उच्छृखल असल्या कारणाने मुंज राजा त्याला फार सक्तीने वागवी. यावरून तो गुजराथेत गेला. काही दिवसांनी तो परत आला तेव्हां मुंजराजाने त्याला कैदेत