________________
काश्मीर. अशोकाचे वेळेस हा देश मौर्य साम्राज्यांत मोडत होता. कनिष्क व हविष्क यांचेही राज्यांत तो सामील होता. हर्ष राजाच्याने हा प्रांत घेववला नाही. परंतु बुद्धाचा एक दांत काश्मीरच्या राजाजवळ होता तो त्याने त्या राजास आपल्याला द्यावयाला लाविलें. तो दांत हर्ष राजानें कनोज येथे नेऊन ठेविला. हर्ष राजाच्या हयातीत काश्मीर प्रांतांत दुर्लभवर्धनाने कर्कोट वंश स्थापन केला. त्याचे नातू चंद्रापीड व मुक्तापीड ऊर्फ ललितादित्य या दोघांस चीनच्या बादशहाने राजा हा किताब दिला. ललितादित्याने आपले राज्य बरेंच वाढविले. त्याने कनोजचा राजा यशोवर्मा याचा पराभव केला व तिबेट, भूतान, व सिंधूनदीवरील तुर्क लोक यांनाही जिंकले परंतु त्याची कीर्ति मुख्यत्वेकरून त्याने बांधलेलें मूर्याचे मार्तड मंदिर यावरून आहे. हे मंदिर अद्यापि आहे. त्याचा नातू जयपीड ऊर्फ विजयादित्य याचे संबंधाने बऱ्याच गोष्टी राजतरंगिणींत लिहिल्या आहेत. त्या सर्व खऱ्या आहेत असें वाटत नाही. परंतु तो राजा क्रूर व लोभी होता असे बिल्हणाचे पुढील आशयाचे लेखावरून स्पष्ट दिसून येते. “ याप्रमाणे या प्रसिद्ध राजाचे एकतीस वर्षे राज्य चालले. त्याच्या मनोवृत्ति अनावर होत्या. राजांच्या व पाण्यांतील माशांच्या स्थितीत बरेच साम्य आहे. ज्याप्रमाणे मासे वाईट पाण्याच्या किंवा इतर आमिषाने मोहित होऊन जेव्हां आपलें स्थळ सोडितात, तेव्हां ते कोळ्याच्या जाळ्यांत सांपडून मरण पावतात; त्याप्रमाणे राजे जेव्हां संपत्तीच्या लोभाच्या पाशांत सांपडतात, तेव्हां ते अनीतीच्या मार्गाचे अवलंबन करितात व त्यांचा अंत कष्टमय होतो."