Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नागसेनः-नाही. परंतु या नामरूपांच्या योगाने बरी अथवा वाईट कर्मे घडतात, व या कर्माच्या योगानें नवें नामरूप जन्मास येते. बौद्ध मताप्रमाणे बाह्य जगताला अस्तित्वच नाही. सर्व ज्ञान म्हणजे मनुष्याचा अनुभवच आहे, व म्हणूनच जगतातील सर्व वस्तु क्षणिक आहेत. बौद्धमताचा प्रसार होण्यास त्यांतील अध्यात्म विचार फारसे कारणीभूत झाले असे नाही. जनतेवर त्या मताचा परिणाम मुख्यत्वेकरून, त्याचे नीतिसंबंधी शिक्षणामुळे झाला. बौद्ध उपदेशक लोकांना धर्म अथवा नीति सांगू लागले. महाभारतांत शांतिपर्व व अनुशासन पर्व यांत अशा प्रकारची म्हणजे धर्माची व परमेश्वराव्यतिरिक्त केवळ नीतीची विवेचनें आहेत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे दुःख नाहीसे होण्यास बौद्धमतानें आठ उपाय आहेत. अशोक राजाचे व बौद्ध उपदेशकांचे यत्नांचा लोकांवर जो विशेष परिणाम झाला, त्याचे कारण बौद्धमताचा हा नीतिवर्धक मार्ग में होय. गोतम बुद्धाचे सामर्थ्य कांही अलौकिक प्रकारचे होतें, व तो देवाचाच अंश होता अशी सामान्य जनतेची समजूत असल्याकारणानेही त्याच्या मताचा प्रसार मोठ्या झपाट्याने झाला.गौतम बुद्धाचा विशेष कटाक्ष यज्ञयागावर होता. ब्राह्मणांचे म्हणणे असे होते की,वेद हे मनुष्यास मोक्षप्राप्ति करून देण्यास समर्थ आहेत. हे म्हणणे गौतम बुद्धास कबूल नव्हते. त्याच्या मतांत जाति व वर्ण ही जरी नव्हते तरी त्या मतांचा मुख्य हेतु जाति व वर्ण काढून टाकण्याचा नव्हता. इतकेच नव्हे, तर पूर्वीपासून चालत आलेल्या व्रतवैकल्याच्या गोष्टी सुद्धा त्याचे अनुयायांनी केल्यास त्याची त्यासंबंधाने विशेष हरकत नव्हती. बौद्ध धर्म सामाजिक सुधारणा करण्याचे हेतूनें स्थापित झाला होता असे नाही. तो ज्यांनी स्थापित केला व त्याचा ज्यांनी प्रसार केला त्यांनी समाजाचा पूर्णपणे