________________
भाग १० वा. हर्ष राजाची कारकीर्द. (इ. स. ६०६-६४७ ) इ. स. ५५० पासून ६०० पर्यंतच्या इतिहासाची चांगली साधनें नाहींत. परंतु त्यापुढील इतिहास बाणकवीच्या हर्ष चरित्रावरून व हि-उएन-त्संग याचे प्रवासवर्णनावरूच बराच चांगला समजतो. इ. स. ६०० च्या सुमारास ठाणेश्वरचा राजा प्रभाकरवर्धन हा आपल्या पराक्रमाने बराच प्रसिद्धीस आला होता. ६०४ साली त्याने आपला वडील मुलगा राज्यवर्धन याला मोठी फौज देऊन वायव्येच्या मरहद्दीवर हूण लोकांवर पाठविले. त्याच्या मागून आपला धाकटा मुलगा हर्ष ह्यालाही घोडेस्वार बरोबर देऊन राज्यवर्धनाच्या मागोमाग पाठविले. या वेळेस हर्षाचे वय फक्त १५ वर्षांचे होते. हर्षवर्धन हा लढाईवर गेल्यानंतर त्याला आपला बाप अतिशय आजारी असल्याचे समजले. त्यावरून तो राजधानीस लवकर परत आला. पण राज्यवर्धन परत येण्याच्या पूवाच त्यांचा बाप वारला होता. तो परत आल्यावर राज्यारूढ झाला. परंतु लवकरच त्याची बहीण राजश्री इचा नवरा कनोजचा राजा गृहवर्मा याला माळव्याच्या राजाने मारल्याची खबर आली, व त्याने राज्यश्रीलाही कैदेत टाकल्याचे समजले. ही खबर लागतांच दहा हजार घोडेस्वार बरोबर घेऊन तो आपल्या बहिणीची सुटका करण्यास निघाला. माळव्याच्या राजाचा त्याने पराभव केला. परंतु त्या राजाचा दोस्त मध्य बंगालचा राजा शशांक ह्याने विश्वासघाताने राज्यवर्धनास मारले. नंतर राज्यश्री कैदेतून सुटून विन्ध्यपर्वतांत गेल्याचीही खबर हर्षास लागली.