पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९८
भारतीय लोकसत्ता

महत्त्व ते जाणू शकले नाहींत. खरें चैतन्य कोठे आहे हे कळण्याइतकी दिव्यदृष्टि त्यांना नव्हती. त्यामुळे राजा, सैन्य, जमीनदार, भांडवलदार याच शक्ति तेथे जोरावल्या. जपानी नेत्यांनी आपली शासनसंस्था जर्मनीच्या नमुन्यावर उभारली आणि व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य यासाठी निर्माण झालेल्या चळवळी दडपून टाकल्या. ओकुबा व किडो या दोन थोर पुरुषांनी लोकसत्तेची चळवळ रूपाला आणली होती, पण त्यांचे खून करण्यांत आले आणि तेव्हांपासून जपानमध्ये भांडवली लष्करशाहीचा अंमल सुरू झाला. सत्सुमा, चोशीयु अशा एकदोन धनसंपन्न घराण्यांच्या हातीं राजसत्तेची सर्व सूत्रे गेलीं आणि थोड्याच अवधीत जपानवर पूर्ण अनियंत्रित अशी सत्ता प्रस्थापित झाली. याच्याच जोडीला अंध व अतिरेकी राजनिष्ठा व पूर्वज पूजा यांचे तत्त्वज्ञान जपानमध्ये पसरले आणि तेथील सामान्य जनता प्रज्ञाहत होऊन व्यक्तिस्वातंत्र्याचा विचारहि विसरून गेली.

चीन

 चीनचे राष्ट्रपुरुष डॉ. सन्यत्सेन यांची गोष्ट जरा निराळी असली तरी त्यांच्या प्रारंभींच्या चळवळीचे सूत्र जनशक्तीची उपासना हें नव्हतें. आयुष्याच्या उत्तरकालीं ते लोकसत्तेचे कट्टे पुरस्कर्ते झाले, पण प्रारंभीं क्रान्ति घडवून आणण्यासाठी त्यांनी देशांतील लष्करी बळाचाच उपयोग केला होता. त्यांची चळवळ ही गुप्त कट, खून, दहशत या मार्गाने जाणारी असून राजसत्तेविरुद्ध त्या राजसत्तेची सेनाच उठवून द्यावी असा या क्रान्तिकारकांचा प्रयत्न होता. तो १९११ साली यशस्वी झाला आणि राजसत्ता उलथून पडली. पण ही क्रान्ति म्हणजे लष्करकृत क्रान्ति होती. लोककृत नव्हती आणि त्यामुळेच क्रान्तीनंतर सर्वत्र बेबंदशाही माजली. सर्वत्र सरदार, जमीनदार व लष्करशहा यांचें राज्य सुरू झालें. देशामध्ये लोक, जनता ही खरी शक्ति असून लष्कर ही खरी शक्ति नव्हे, हे डॉ. सन यांनी प्रथम ध्यानी धरले नव्हते. निदान त्या दिशेने त्यांनी प्रयत्न केले नव्हते हें निश्चित. त्यामुळेच ते क्रान्तीनंतर लगेच फशी पडले. ज्या लष्करी शक्तीनें स्वातंत्र्य हें फल मिळविले होते तिनें तें आपल्याच ताब्यांत ठेवले आणि संघटनेच्या अभावीं ती शतधा भिन्न होतांच देशाचीहि तितकीच