पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९७
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

केर्ले, त्यांच्या सामर्थ्यांनें आणि म्हणूनच मिळालेले स्वातंत्र्य त्याच शक्तीच्या ताब्यांत राहिले. १८७० नंतर इटलीत कांहीं मर्यादित स्वरूपांत लोकसत्ता सुरू झाली, पण तिला पायाच नव्हता. कारण 'लोक' ही शक्ति तेथे कोणी जागृत केली नव्हती आणि म्हणूनच इटलींत लोकसत्ता यशस्वी होऊं शकली नाहीं. ज्या शक्तीनें स्वातंत्र्य मिळविले तिनेंच ते आपल्या ताब्यांत ठेविलें, आतां इटलींत ही शक्तिहि जर्मनीप्रमाणे संघटित नसल्यामुळे त्या देशांत लोकसत्ता तर नाहींच पण कोणचीच शासनसंस्था प्रबळ होऊ शकली नाहीं; पण तो भाग निराळा. आपणांस लक्षांत घ्यावयाचें तें हें कीं, ब्रिटन अमेरिकेचे उदाहरण डोळ्यांसमोर असून, मार्क्सप्रणीत आंदोलने जोराने उसळत असून जर्मनी व इटली या देशांतील नेत्यांनी देशांतील खरी शक्ति, स्वतःच्या भूमीचा खरा आत्मा, तेथलें खरें चैतन्य जागृत करण्याचा प्रयत्नहि केला नाहीं. इतकेच नव्हे तर त्या चैतन्याचा त्यांनीं तेजोभंगच केला आहे. लोकशाहीचे मूलभूत तत्त्वज्ञानच या धुरीणांना मान्य नव्हते.

जपान

 त्याच काळांत उदयास आलेले तिसरे राष्ट्र म्हणजे जपान. या देशांत मेजी युगाचा १८६७ ते १९१२ हा काल अत्यंत उज्ज्वल असा होता. अनेक शतकें अंधारांत घोरत पडलेल्या या राष्ट्राने ४०/५० वर्षात जी प्रगति केली ती केवळ अपूर्व होती. तेथील सरदारवर्ग व सामुराई हा लढाऊ वर्ग यांनी जो त्याग केला तो निस्तुळ असाच होता. या युगांत प्रारंभीं ज्या सुधारणा झाल्या त्या लोकशाहीला व जनशक्तीच्या वाढीला पोषक अशाच होत्या. जन्मनिष्ठ उच्चनीचता सम्राटाच्या एका आज्ञापत्राने नष्ट करण्यांत आली. ज्ञानावरील निर्बंध एकदम दूर करण्यांत आले. परदेशगमनास उत्तेजन देण्यांत आलें. अनेक जुन्या घातक रूढी नष्ट करण्यांत आल्या आणि याच दिशेने प्रगति झाली असती तर जपानमध्ये जनशक्ति जागृत झाली असती. पण जपानमध्ये टिळक किंवा महात्माजी हे जन्मास आले नाहींत. तेथील नेत्यांना, आरंभींच्या उदारमतवादी नेत्यांनाहि राष्ट्रांतील खऱ्या शक्तीचा, जनता या शक्तीचा अवगम झाला नाहीं. तिचें
 भा. लो....७