पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९६
भारतीय लोकसत्ता

संघटनेचे कार्य पूर्ण करीत आणले होते आणि त्यानंतर पुढील ४०/५० वर्षे त्या राष्ट्राचा सारखा उत्कर्ष होत राहिला. या उत्कर्षाचे श्रेय बव्हंशी त्या देशांतील राजाचे वज्रबाहु प्रधान प्रिन्स बिस्मार्क यांना देण्यांत येते आणि तें युक्तच आहे. पण आपल्यापुढे प्रश्न असा आहे कीं, स्वदेशाचा हा अभ्युदय बिस्मार्क यांनी कोणच्या शक्तीच्या साहाय्याने घडवून आणला ? राजा व त्याचॆं सैन्य हीच शक्ति बहुतेक सर्व देशांत प्रधान असते. जमीनदार, सरंजामदार ही दुसरी शक्ति होय. राजा दुबळा असेल तर देशांत हिचेंच वर्चस्व असते. तिसरी अर्वाचीन काळांत निर्माण झालेली शक्ति म्हणजे भांडवल ही होय. तिचेंच कमीअधिक प्राबल्य आज जगांतील बहुतेक देशांत आहे. यानंतर एक शक्ति राहिली. कष्टाळू जनता, शेतकरी, कामकरी ही ती शक्ति होय. गेल्या शतकाच्या प्रारंभापर्यंत हा वर्ग म्हणजे एक शक्ति आहे हेंच कोणाला मान्य नव्हते. कार्लमार्क्सने जगांतल्या या अजिंक्य व अतुल शक्तीला आवाहन करून तिला जागृत केले व तिच्या ठायींचा आत्माहंकार प्रदीप्त केला. आज जगांत असा एकहि देश नाहीं कीं जेथे या शक्तीचे अधिराज्य तत्त्वतः अमान्य आहे. बिस्मार्कच्या वेळीं या शक्तीच्या अस्तित्त्वाची, प्रभावाची व भवितव्याची जाणीव पश्चिम युरोपांतील सर्व देशांना झाली होती. इंग्लंडमध्ये या शक्तीचा प्रभाव कांहींसा दिसूंहि लागला होता. तेथले वारे त्या दिशेने वाहूं लागले होते. असे असूनहि बिस्मार्कने त्या शक्तीची उपासना करण्याचें मनांतहि आणले नाहीं. राजा, लष्कर, जमीनदार याच शक्तीचा त्यानें आश्रय केला व स्वदेशाची उन्नति घडवून आणली. लोक, जनता, समाज या शक्तीला त्याने आवाहनच केलें नाहीं. तेच धोरण बिस्मार्कनंतरच्या सर्व जर्मन नेत्यांनी अवलंबिले आणि म्हणूनच जर्मनींत लोकसत्ता मूळहि धरूं शकली नाहीं. जर्मनीच्या शेजारचे राष्ट्र इटली. तेथेहि वीस वर्षांपूर्वी हाच प्रकार घडून आला. तेथील राष्ट्रनायक काव्हूर यांनी 'जनता' या शक्तीची उपसना केली नाहीं. मॅझिनी हा लोकसत्तेचा व म्हणून जनशक्तीचा कट्टा उपासक होता हें खरें पण ती जनशक्ति प्रत्यक्ष संघटित करून राष्ट्राचे स्वातंत्र्य परत मिळविण्याच्या कार्यात दुर्दैवाने त्याला यश आले नाहीं. राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालें तें काव्हूरने ज्या राजशक्तीचा आश्रय केला व ज्या सरदार जमीनदारांनी त्याला साह्य