पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९५
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

यशस्वी होण्यास ज्या एका व्यक्तीचे प्रयत्न सर्वात जास्त कारणीभूत झाले आहेत ती व्यक्ति म्हणजे लो. टिळक हीच होय. आज हिंदुस्थानांत लोकायत्त शासन स्थिर करण्यांत, यशस्वी करण्यांत अल्पस्वल्प यश आले आहे आणि पुढील वीस पंचवीस वर्षांत हा देश म्हणजे एक अत्यंत बलाढ्य लोकायत्त राष्ट्र होईल अशी आशा आहे. तसे झाल्यास जगांतल्या लोकशाहीला हा एक प्रचंड आधार निर्माण होईल. आज जगांत कम्यूनिझमच्या नांवाखालीं अत्यंत उग्र अशी दण्डसत्ता सर्वत्र प्रस्थापित होत आहे. तोच पायंडा पडला तर लोकशाहीच्या तत्त्वावर पुन्हां भयानक अरिष्ट आल्यावांचून राहणार नाहीं. अशा वेळी भरतखंड हें जर एक प्रबल असे लोकसत्ताक म्हणून टिकून राहिले तर जगाच्या इतिहासाला निराळे वळण लागेल. आपले राष्ट्र ही एक प्रबल अशी लोकसत्ता घडविण्यांत आपल्याला यश येईल याविषयीं येथल्या नेत्यांना मुळींच संदेह नाहीं आणि येथील जनतेलाहि ती आशा वाटू लागली आहे. आणि त्यामुळेच जगाच्या इतिहासाला वळण लावण्याचे कार्य आपल्या हातून होईल असा आत्मविश्वास या भूमींत स्फुरण पावत आहे. जगाला लोकायत्त शासनाचे वळण लावण्याचे कार्य या भूमीला करतां आलें तर भावी जग पिढ्यान् पिढ्या तिचें ऋणी राहील आणि मग या महान् कार्यांचें श्रेय, येथल्या लोकसत्तेचा ज्या महापुरुषाने सतत चाळीस वर्षे खपून भरभक्कम पाया घातला त्याच्या, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या पायांवर वहाण्यास जग मोठ्या भक्तीनें तयार होईल.

कोणच्या शक्तीची आराधना ?

 लो. टिळकांनी १८८०।८१ च्या सुमारास सार्वजनिक कार्यास प्रारंभ केला. त्या काळच्या जगांतल्या भिन्नभिन्न राष्ट्रांतील कर्त्या पुरुषांच्या चरित्रांकडे आपण दृष्टि टाकली, त्यांनी आपल्या देशांतील राजकारण कसें चालविले हे पाहिले आणि कोणच्या शक्तीच्या साहाय्याने आपल्या देशांची उन्नति घडवून आणली याचा विचार केला म्हणजे टिळकांचे लोकोत्तरत्व, त्यांचे जगांतले अद्वितीय स्थान व लोकसत्तेची त्यांनीं जी सेवा केली तिचे महत्त्व आपल्या ध्यानीं येईल, जर्मन राष्ट्र त्या वेळीं संघटित होऊन नुकतेंच उदयास येत होते. १८७० साली त्यानें फ्रान्सचा पराभव करून राष्ट्रीय