पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९४
भारतीय लोकसत्ता

विचार आपणास करावयाचा आहे. पहिल्या क्षेत्रांत जशी राममोहन, रानडे व आगरकर यांची नांवें डोळ्यापुढे उभी राहातात, तशीं या क्षेत्रांत लो. टिळक, महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू या थोर विभूतींच नावें पुढे येतात. भारताच्या आपल्या आजच्या लोकसत्तेचे हे तीन शिल्पकार आहेत. यांपैकी एकाचेंहि कार्य उणें केले तर आपल्या लोकसत्तेचें मंदिर उभे राहू शकणार नाहीं. म्हणून त्यांच्या कार्याचा आपणांस साकल्याने विचार करावयाचा आहे. त्यापैकी पहिले शिल्पकार, आपल्या लोकसत्तेचे मंत्रद्रष्टे जे लोकमान्य टिळक त्यांच्या दिव्य मंत्राचें मनन व चिंतन करण्यास आतां आपण प्रारंभ करूं.




प्रकरण पांचवें


भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता


 जगांतील एकंदर लोकसत्तेचा इतिहास लिहावयास जो कोणी इतिहासकार बसेल त्याला सर विन्स्टन चर्चिल यांना त्या इतिहासांत फार मोठे मानाचे स्थान द्यावें लागेल, याचे कारण अगदीं उघड आहे. हिटलरी दण्डसत्तेच्या आक्रमणांतून जगाला सोडविण्याचे महत्कार्य त्या पुरुषाने केले आहे. त्याच्या अभावी आज जगांतली सर्व लोकसत्ता नामशेष झाली असती आणि जग दण्डसत्तेच्या पाशवी सामर्थ्याला बळी पडून पुन्हां रानटी स्थितीप्रत पोचलें असतें. जगावरची ही आपत्ति विन्स्टन चर्चिल यांनी आपल्या महान् सामर्थ्याने टाळली आहे आणि म्हणूनच जग त्यांचें ऋणी झालें आहे. हे जर खरे असेल, चर्चिल यांनी लोकसत्तेची जी सेवा केली तीमुळे सध्यांचे जग त्यांचे ऋणी आहे हे जर आपण मान्य करणार असलों- आणि तें आपणांस मान्य केलेच पाहिजे- तर यापुढचे जग भरतभूमीचे विख्यात सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे त्याच्यापेक्षां दसपट शतपट जास्त ऋणी राहील हे आपणांस मान्य करावें लागेल. कारण या भूमींतली लोकसत्ता