पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९३
भौतिक अधिष्ठान

लागेल. भौतिक अधिष्ठानाचे पुरस्कर्ते पूर्वपरंपरेचा अभिमान धरीत नाहींत, तिला तुच्छ लेखतात हाहि समज भ्रामक आहे. या पंथांतील मार्क्सवादी लोकांची ती वृत्ति होती हें खरे आहे. पण एक तर रशियांतूनहि ती आतां समूळ नष्ट झाली आहे आणि दुसरे म्हणजे एका शाखेवरून सर्व तत्त्वज्ञानाचा अधिक्षेप करणें युक्त होणार नाहीं. प्राचीन आर्यत्व सोडावयाचें नाहीं हा तर आगरकरांचा बाणा होता. सुधारक पत्रांतील पहिल्या लेखांतच त्यांनी त्याचा घोष केला होता. तेव्हां भौतिकवादासंबंधींचीं ती भीतिहि निर्मूल आहे हे जनतेने ध्यानात घ्यावें आणि निःशंक मनाने आपल्या लोकायत्त शासनास आवश्यक असलेल्या क्रांतीला पाठिंबा द्यावा.
 या विचारानेहि पुष्कळांचे समाधान होणार नाहीं. कारण अजूनहि समाजांतील बहुसंख्य लोकांच्या मनांत धर्मश्रद्धा अगदीं जाज्वल्य स्वरूपांत टिकून आहे. त्यांनी हे ध्यानीं घ्यावें कीं, लोकशाहीएवढा श्रेष्ठ धर्म जगांत दुसरा नाहीं. प्रत्येक व्यक्तीची बुद्धि, तिचे मानसिक सामर्थ्य, तिचे हृदयाचे गुण, या सर्वांच्या म्हणजेच तिच्या व्यक्तित्त्वाच्या विकासाला अवसर देणें यापेक्षां जास्त उदात्त असें दुसरें काय आहे ? प्रत्येक व्यक्तीला हक्कानें उद्योग व अन्नवस्त्र मिळावे हे तत्त्व दानधर्मापेक्षा जास्त श्रेष्ठ नाहीं काय ? या गोष्टी आज सिद्ध झाल्या तर लोकशाहीच्या परिणतीनेच होतील. पण आध्यात्मिक व पारमार्थिक धर्माचे वर्चस्व जर ऐहिक व्यवहारावर राहिलें तर मात्र या गोष्टी कालत्रयीं प्रत्यक्षांत येणार नाहींत. हें ध्यानांत येऊनच लो. टिळकांसारख्या हिंदुधर्म व भारतीय संस्कृति यांच्या कडव्या पुरस्कर्त्यानें कॉंग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाच्या जाहीरनाम्यांत धर्मनिरपेक्ष शासनाला मान्यता दिली होती. तेव्हां भौतिकवादाच्या आश्रयाने कोणत्याहि प्रकारची आध्यात्मिक, धार्मिक वा सांस्कृतिक अधोगति होण्याचा अणुमात्रहि संभव नाहीं हें जाणून भारतीय जनतेनें हें मन्वंतर घडवून आणावे. तसें केलें तरच भारतीय लोकसत्ता यशस्वी होऊन आपले राष्ट्र बलशाली व वैभवशाली होऊ शकेल.
 मानवाची प्रतिष्ठा, समता व भौतिक अधिष्ठान या तत्त्वांच्या प्रतिपादनानें व उपदेशानें राममोहन रॉय, रानडे, आगरकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनीं भारतीय लोकसत्तेची पूर्वतयारी कशी केली, त्याचे येथवर विवेचन केले. आतां लोकशाहीचे अगदीं आत्मीय क्षेत्र ने राजकारण तेथील कार्याचा