पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९२
भारतीय लोकसत्ता

तर दुसरा जुन्या समानपीठिकांतूनच नवीन पीठिका निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. नवतत्त्वांना विरोध कोणाचाच नसतो. त्या तत्त्वांची प्रतिष्ठापना करण्याच्या मार्गाविषयींच मुख्यतः मतभेद असतो. या दोन वर्गापैकी आगरकर हे पहिल्या वर्गातील असून स्वामी विवेकानंद हे दुसऱ्या वर्गातील होत. लो. टिळक, महात्मा गांधी यांची विचारसरणी स्वामीजींच्या विचारसरणीसारखीच होती आणि म्हणूनच टिळकांनीं आगरकरांना विरोध केला होता. या दोन्ही प्रेरणांचा म्हणजे क्रान्तिप्रेरणा व विकास प्रेरणा यांचा विचार केला तर असे दिसून येईल कीं समाजाच्या प्रगतीला या दोहींची सारखीच आवश्यकता असते. श्रीकृष्ण, टिळक, महात्माजी, विवेकानंद या विभूतींची जगाला जेवढी आवश्यकता असते तेवढीच गौतमबुद्ध, आगरकर, मार्क्स यांची पण असते. कोणच्या काळीं कोणची प्रेरणा कमीजास्ती प्रमाणांत हितावह ठरेल, एवढाच काय तो प्रश्न असतो.
 आणि या तारतम्याचा विचार पाहून निर्णय करावयाचा तर आज आपण आगरकरांचे शिष्यत्व पत्करण्यास कोणताच प्रत्यवाय येण्याचें कारण नाहीं. स्वामी विवेकानंदांचे कार्य आतां होऊन गेलें आहे. त्यानंतर टिळक व महात्मानी यांच्या कार्याची परिणति होऊन आपणांस स्वातंत्र्याची प्राप्तिहि झाली आहे. आतां आपला राष्ट्रीय अहंकार इतका प्रबल झाला आहे, कीं पाश्चिमात्य तत्त्वांचा आपण कितीहि व कसाहि अंगीकार केला तरी आपला आत्मप्रत्यय ढळण्याची कालत्रयी शक्यता नाहीं. तेव्हां अशा स्थितीत लोकशाहीला अवश्य असे भौतिक अधिष्ठान आपल्या समाजाला प्राप्त करून देण्यांत कसलीहि हानि नाहीं, कसलाहि धोका नाहीं. धर्माचे अधिष्ठान बदलणे म्हणजे धर्मांची अवहेलना करणे असा मुळींच अर्थ होत नाहीं. ऐहिक व्यवहारांतील प्रत्येक क्षेत्रांत पारमार्थिक मोक्षधर्माची, त्याच्या नियमनांची जी अप्रतिहत सत्ता चालत असे ती नाहींशी करून तेथलीं नियमनें इतिहास, अनुभव, प्रयोग, अवलोकन यांच्या साहाय्याने निश्चित करणे एवढाच भौतिक अधिष्ठानाचा अर्थ आहे. भारताच्या प्राचीन व अर्वाचीन आध्यात्मिक वैभवाला यामुळे अणुमात्र धक्का लागण्याचे कारण नाहीं. उलट त्या अध्यात्मानें कारण नसतांना ऐहिकाची जी आतांपर्यंत हानि केली ती बंद झाल्यामुळे समाज त्याच्याकडे जास्तच आदराने पाहूं