पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९१
भौतिक अधिष्ठान

नास्तिकतेनेंच राष्ट्र वर येण्याचा जास्त संभव आहे." (पृ. २७९) 'सुधारक काढण्याचा हेतु' या लेखांत आगरकरांनी यापेक्षां जास्त तीव्र असे काय लिहिले आहे ?
 एके ठिकाणी स्वामीजी म्हणतात, 'आम्ही हिंदुस्थानांतले संन्यासी ! बहुजनसमाजासाठीं, गरीब जनतेसाठी आम्ही काय केले आहे ? आम्हीं संन्यासी त्यांना अध्यात्म शिकवीत आहों ! यापेक्षां मूर्खपणा तो काय ? भुकेल्या माणसाला परमार्थ सांगणे ही धर्माची शुद्ध चेष्टा आहे. आज लक्षावधि लोक अन्नान्न करीत आहेत. त्यांची पशूसारखी अवस्था झाली आहे. त्यांना सोडून परमेश्वराचा तुम्ही अन्यत्र कोठे शोध चालविला आहे ? ही गरीब जनता हाच परमेश्वर नव्हे काय ? त्यांची सेवा करतांना मला नरकवास आला तरी मी तो पतकरीन. भारताचे भवितव्य मूठभर उच्च लोकांवर अवलंबून नसून या कोट्यवधि जनतेवर आहे. तिला समतेचा व स्वातंत्र्याचा संदेश दिला पाहिजे. असे करतांना आपण कट्टरातले कट्टर पाश्चिमात्य झाले पाहिजे. मात्र त्याच वेळी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या श्रेष्ठधर्मांचा आपणांस कधींहि विसर पडतां कामा नये." (विवेकानंद चरित्र खंड ४ था. प्रबुद्धभारत. पृ. १७७-१८२ )
 वर दिलेल्या अनेक उताऱ्यांवरून स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीची कल्पना येईल. आपल्या समाजाचे धार्मिक अधिष्ठानच बदलून टाकावें असें त्यांचें मत नव्हतें हें खरे, पण भौतिकवाद ते त्याज्य मानीत नव्हते, इतकेंच नव्हे तर आजच्या परिस्थितींत आपल्या उन्नतीसाठीं त्याचा स्वीकार करणे अवश्य आहे असे ते आग्रहाने सांगत होते, हे आपण विसरू नये. त्यांचा विरोध होता तो मार्गासंबंधी होता. येथल्या परंपरांचा नाश करून किंवा येथल्या जीवनाचे ओघ आमूलाग्र बदलून येथें नवेंच कांहीं स्थापावें त्यांना मान्य नव्हते. जे कांहीं नवें यावयाचे ते पूर्वस्थितींतून विकसित होऊन यावें असें त्यांचे मत होते. 'मला सुधारणा किंवा क्रान्ति मान्य नसून विकास मान्य आहे,' असें ते नेहमीं म्हणत.
 जगांतल्या सुधारकांचे सगळीकडेच दोन वर्ग पडलेले दिसतात. एक शुद्ध तर्काच्या व बुद्धिवादाच्या आश्रयानें आमूलाग्र क्रांति करूं पहात असतो,